Nashik Water Supply | दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना मोठा दिलासा; शहराच्या पाणीपुरवठ्यात दररोज 30 दशलक्ष लिटरची वाढ

Nashik Water Supply | दररोज ३० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणीपुरवठा
Water Supply
Water SupplyPudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
एकिकडे पाणीकपातीची तयारी सुरू असताना, दुसरीकडे पाण्यापासून नाशिककरांची दिवाळी अडचणत येऊ नये, यासाठी महापालिकेने दिलासादायक निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या काळात पाण्याची वाढती गरज लक्षात घेत शहराच्या पाणीपुरवठ्यात दररोज सुमारे ३० दशलक्ष लिटरने वाढ करण्यात आली आहे. एरवी महापालिकेतर्फे शहरात ५८० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो, त्यात वाढ करून आठवडाभरासाठी दररोज ६१० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

Water Supply
Simhastha Kumbh Mela | नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आखाड्यांच्या निधीत घसघशीत वाढ; प्रत्येकी 7 कोटी मिळणार

नाशिक शहराला प्रामुख्याने गंगापूर धरण व काही प्रमाणात मुकणे व दारणा धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. गंगापूर धरणातून पंपिंग स्टेशनद्वारे पाणी उचलून थेट जलवाहिनीद्वारे जलशुद्धीकरण केंद्रांपर्यंत आणले जाते. जलशुद्धीकरण केंद्रात त्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करत १३० जलकुंभ आणि २९०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांद्वारे घरोघर पोहोचवले जाते.

यंदा सुरुवातीच्या काळात कोसळलेल्या मुसळधार पावसाने धरणे भरली असली, तरी परतीच्या पावसाने ओढ दिल्याने राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी राज्यभर १० टक्के पाणीकपातीचा निर्णय शासनाने घेतला आहे.

नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर, मुकणे व दारणा धरणे काठोकाठ भरलेली असली, तरी शासनाचा निर्णय नाशिकसाठीदेखील लागू असल्याने दिवाळीनंतर नाशिककरांवरदेखील पाणीकपात होणे आता अटळ बनले आहे.

तत्पूर्वी दिवाळीच्या सणासुदीच्या काळात नाशिककरांच्या पाण्याच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. दिवाळीची साफसफाई यामागील प्रमुख कारण आहे. शहराच्या उंच-सखल भागात अनियमित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी आहेत.

Water Supply
President Droupadi Murmu | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नाशिक-त्र्यंबकेश्वर दौरैनंतर प्रशासकीय स्तरावर होणार महत्त्वाचे 'डी-ब्रीफिंग'

सणासुदीच्या काळात यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण होऊ नये, यासाठी महापालिकेने अतिरिक्त ३० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाची अंमलबजावणी प्रशासनाकडून तातडीने सुरू करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांनी दिली.

टँकरच्या संख्येत वाढ

पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी असलेल्या तसेच जलवाहिनीच्या कामामुळे पाणीपुरवठा पर्याप्त होत नसलेल्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. आवश्यकतेनुसार या टँकरच्या संख्येतही वाढ करण्याची तयारी पाणीपुरवठा विभागाने केली असल्याची माहिती धारणकर यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.