नाशिक : नाशिक शहरात भटक्या व मोकाट कुत्र्यांची संख्या लाखाच्या घरात असताना पाळीव कुत्र्यांची संख्या अवघी २६३४ असल्याचे महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाकडील नोंदणीकृत आकडेवारी समोर आली आहे. शहरातील उच्चभ्रू वस्तीत जवळपास २५ टक्के घरात पाळीव कुत्रे असताना या कुत्र्यांच्या मालकांनी नोंदणीकडे पाठ फिरवल्याने नोंदणीकृत कुत्र्यांचा आकडा कमी दिसत आहे.
भटक्या कुत्र्यांकडून वारंवार होणारे हल्ले लहान मुलांसह महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. अपार्टमेंट किंवा सोसायटीतील पाळीव श्वान, बंगले आणि घरांत पाळीव श्वानांमुळे देखील त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी येत असतात. त्यामुळे अशा तक्रारींचे निराकरण व्हावे आणि श्वान पालकांकडून नियमांचे पालन केले जावे, यासाठी शासनाच्या कायद्यानुसार महापालिकेकडे श्वानांची नोंद करणे बंधनकारक आहे. यासाठी मनपाच्या पशूसंवर्धन विभागाने सोय उपलब्ध करून दिली आहे.
श्वान नोंदणीस 350 रुपये खर्च
मनपाच्या संकेतस्थळावरील विविध परवाने आणि पशूसंवर्धन विभागाअंतर्गत नोंद करता येते. त्यासाठी ३५० रुपये शुल्क आकारले जाते. वर्षभरानंतर परवाना नूतनीकरणासाठी २५० रुपये आकारले जातात. शुल्क अदा केल्यानंतर श्वान पालकास परवाना असलेले प्रमाणपत्र ऑनलाईन प्रदान केले जाते.
ॲण्टी रेबीज लसीकरण बंधनकारक
पाळीव श्वानाचे ॲंटी रेबीज लसीकरण केल्याशिवाय महापालिकेकडून नोंदणी परवाना दिला जात नाही. पाळीव श्वान स्वत:च्या नियंत्रणात ठेवणे, शेजारी तसेच अन्य कुणालाही त्याचा त्रास होऊ नये, श्वानामुळे अस्वच्छता निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी संबंधीत श्वान मालकाची असते.