

नाशिक : मनपा निवडणुकीची धामधुम सुरू असताना शिवसेना उबाठा गटाने माजी नगरसेविका वैशाली दाणी यांचा प्रवेश करत शिंदे सेनेला धक्का दिला. यामुळे नाशिकरोडच्या प्रभाग क्र. २२ मध्ये उबाठाचा पॅनल भक्कम होणार आहे. त्यामुळे उबाठाला गृहीत न धरणाऱ्या शिंदेसेनेला हा मोठा फटका मानला जात आहे.
शालिमार येथील उबाठाच्या कार्यालयात मंगळवारी (दि.२३) हा प्रवेश सोहळा पार पडला. पक्षाचे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड यांच्या उपस्थितीत दाणी यांना प्रवेश देण्यात आला. माजी आमदार वसंत गिते, महानगरप्रमुख प्रथमेश गिते, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी उपस्थित होते. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी व महायुतीत जागा वाटपाची बोलणी सुरू आहे. दुसरीकडे जागे संदर्भात ठोस निर्णय होत नसल्याने घोडे अडले आहे. वेळ कमी असल्याने पॅनल तयार करत अनेकांनी प्रचार सुरू केला आहे. गेल्या अनेक महिन्यापासून उबाठामध्ये आऊटगोईंग सुरू आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर दाणी यांच्या प्रवेशामुळे शिंदे सेनेला धक्का मानला जात आहे. दाणी यांच्यासह योगेश गाडेकर, संजीवनी हांडोरे व माजी नगरसेवक केशव पोरजे यांच्या नावाचा पॅनल प्रभाग २२ मध्ये बनला आहे.
भाजपचे माजी नगरसेवकही वाटेवर
मनपा निवडणुकीत सर्वाधिक इच्छूक असलेल्या भाजपला बंडखोरीचाही सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. महायुती झाल्यास भाजपला काही जागांवर पाणी सोडावे लागेल, अशा जागांवरून निवडणूक लढवण्यास इच्छूक मंडळी भाजपला सोडचिठ्ठी देत उबाठात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारी निश्चितीसाठी उबाठाने वेट ॲण्ड वॉचची भूमिका घेतली आहे.