नाशिक : नाशिक महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्याच्या नगरविकास विभागाकडून हरकतींसह प्रभागरचनेचा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला असून येत्या सोमवारी(दि.६) निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभागरचना जाहीर केली जाणार आहे. यामुळे इच्छूकांची धडधड वाढली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी २२ आॉगस्ट रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली होती. सन २०१७ ची प्रभागरचना कायम ठेवत, चार सदस्यीय २९ तर तीन सदस्यीय २ असे ३१ प्रभाग संख्या कायम ठेवण्यात आली. प्रारुप प्रभागरचनेवर हरकती व सूचना मांडण्यासाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत ९१ हरकती व सूचना दाखल झाल्या. सप्टेंबर महिन्यात प्राधिकृत अधिकारी संजय खंदारे यांच्या उपस्थितीत हरकतींवर सुनावणी झाली. एकाच प्रभागाबाबत अनेक जणांनी हरकती दाखल केल्याने हरकतींमधील साम्य लक्षात घेऊन खंदारे यांनी २४ गटात ९१ हरकतदारांचे म्हणणे एेकून घेतले.
हरकतींची पडताळणी करण्यासाठी प्रशासनाकडून पाच पथके स्थापन करण्यात आली होती. प्रशासन विभाग, नगररचना, बांधकाम विभाग, निवडणूक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या या पथकांमार्फत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून हरकतींची पडताळणी केली गेली. प्रत्येक हरकतीला उत्तर देवून अंतिम अहवाल तयार करण्यात आला. निवडणूक विभागाने ३१ प्रभागांचे बंद लिफाफे तयार करून राज्य शासनाला सादर केले. शासनाने हरकतींसह प्रभागरचनेचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला असून आयोगामाफश्रर्त सोमवारी (दि.६) अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे.
हरकती फेटाळल्या?
सन २०१७ ची प्रभागरचना कायम असल्याने केवळ औपचारिकता म्हणून प्रक्रिया पार पाडली जात असल्याने जैसे-थे प्रभाग रचना राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. प्रारुप प्रभाग रचना हरकती व सूचनांवरील सुनावणीची प्रक्रिया पार पडली असली प्रभागरचनेत बदल होण्याची शक्यता धूसर असल्याची चर्चा आहे.