

नाशिक : महापालिकेच्या गुरुवारी (दि.२०) झालेल्या सलग तिसऱ्या महासभेत रस्त्यांवरील खड्ड्यांवरून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. गेल्या पाच वर्षांत शहरातील खडीकरण, डांबरीकरणासह रस्ते दुरुस्तीवर झालेल्या खर्चाबाबत प्रश्नोत्तराच्या तासात बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना जाब विचारताना नगरसेवकांनी प्रश्नांचा भडिमार केला. गेल्या चार वर्षांत रस्ते दुरुस्तीवर तब्बल २६५ कोटींचा खर्च झाल्याची माहिती यावेळी शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी दिली.
महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली व आयुक्त मनीषा खत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी महासभा पार पडली. प्रश्नोत्तराच्या तासात नगरसेवक दिनकर पाटील यांनी २०२२ पासून आतापर्यंत महापालिका हद्दीतील ३१ प्रभागांमध्ये रस्त्यांच्या खडीकरण, डांबरीकरणाची किती कामे झाली? कोणाला कार्यादेश दिले गेले? खड्डे बुजविण्यासाठी किती खर्च झाला आदी प्रश्न उपस्थित केले.
यावेळी रस्त्यांच्या कामांची यादी सादर करताना शहर अभियंता अग्रवाल यांनी रस्ते दुरुस्तीवर २०२२-२३ मध्ये १०७कोटी, २०२३-२४ मध्ये ११० कोटी, २०२४-२५ मध्ये २२.९० कोटी तर २०२५-२६ मध्ये २५.४८ कोटी अशा प्रकारे महापालिकेतील प्रशासकीय राजवटीतील गेल्या चार वर्षांत खड्डे दुरुस्तीवर तब्बल २६५.३८ कोटींचा खर्च झाल्याची माहिती दिली. भारती धिवरे यांनी महापालिकेच्या मिळकर्तीबाबत प्रश्न उपस्थित केला. तर रस्ते प्रश्नावर वारंवार प्रश्न उपस्थित करूनही प्रशासनाकडून उत्तर मिळत नसल्याबद्दल तिदमे यांनी नाराजी व्यक्त केली.
पाटील-बोरस्ते यांच्यात खडाजंगी
रस्ते प्रश्नावरील चर्चेदरम्यान दिनकर पाटील यांनी अजय बोरस्ते यांच्यावर वैयक्तिक टीका केल्याने उभय नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. महापालिकेचे सभागृह कुणाच्या वैयक्तिक प्रश्नांसाठी नाही. वैयक्तिक आरोप केले जाऊ नयेत. मलाही तुमच्याविषयी खूप काही बोलता येईल, असे बोरस्ते यांनी सुनावले. यावर तुम्हाला काय बोलायचे ते बोला. त्यानंतर मीही बोलणार, असे पाटील यांनी सांगितल्याने सभागृहातील वातावरण तापले. महापौरांनी मध्यस्थी करत पुढील प्रश्न चर्चेला घेतल्यानंतर या वादावर पडदा पडला.
मनपाला नऊ यांत्रिकी झाडू
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत नाशिक महापालिकेला नऊ यांत्रिकी झाडू वाहने प्राप्त झाल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी नगरसेविका संध्या कुलकर्णी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या लेखी उत्तरात महासभेत दिली. मनपाकडे सध्या चार यांत्रिकी झाडू कार्यरत असून, यांत्रिकी विभागामार्फत आणखी दोन यांत्रिकी झाडू खरेदी करण्याचे प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती पलोड यांनी लेखी उत्तरात दिली आहे.
भटके कुत्रे, जनावरांच्या गोठ्यांचा प्रश्न
भटक्या कुत्र्यांचा उपद्रव, वडाळा परिसरातील जनावरांचे अनधिकृत गोठे आणि वारंवार चोकअप होणाऱ्या ड्रेनेजच्या प्रश्नावर नगरसेविका संध्या कुलकर्णी यांनी प्रशासनाला जाब विचारला. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या निर्देशांची प्रशासनाकडून अंमलबजावणी केली जात असून, जनावरांच्या गोठेधारकांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांनी दिली. ड्रेनेज दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधींची उधळपट्टी सुरू असून, तेवढ्या निधीत नवीन ड्रेनेज व्यवस्था होईल, असा दावा सुधाकर बडगुजर यांनी केला. यावेळी शाहू खैरे, चंद्रकांत खोडे, अजिंक्य साने यांनीही चर्चेत सहभाग घेतला.