

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत निमाणी बसस्थानकात काँक्रीटीकरण होणार असल्यामुळे शहरातील एसटी बस वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहेत. त्यानुसार मेळा बसस्थानक आणि नवीन सीबीएस बसस्थानक येथे स्थलांतरित केलेल्या बसफेऱ्यांसाठी मुंबई नाका, द्वारका तसेच इतर मार्गांवरून जाण्या-येण्यासाठी सुधारित मार्ग निश्चित केले आहेत. पोलिस उपायुक्त (मुख्यालय / वाहतूक) चंद्रकांत गवळी यांनी याबाबतची वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे.
निमाणी बसस्थानकातून येवला, लासलगाव, जालना, छत्रपती संभाजीनगर, जिंतूर, बुलढाणा, लोणार या मार्गांवरील बसेस सुटतात. काँक्रीटीकरणाच्या कामामुळे या बसफेऱ्यांच्या वाहतुकीचे नियमन केले आहे. मेळा बसस्थानकातून कोल्हापूर, सांगली, सातारा, शिवाजीनगर (पुणे), मालेगाव, मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, जळगाव, चोपडा, धुळे, शिरपूर, शहादा, सुरत, वापी व इंदूरकडे जाणाऱ्या बसफेऱ्यांचा समावेश आहे.
नवीन सीबीएस (ठक्कर) बसस्थानकातून त्र्यंबकेश्वर, सिन्नर, इगतपुरी परिसरातील ग्रामीण बसफेऱ्यांसह पालघर विभागातील बससेवा, त्र्यंबकेश्वर - पुणे, नंदुरबार, साक्री, सटाणा, बलसाड, कळवण, पेठ, सप्तशृंगगड आणि सुरगाणा मार्गांवरील वाहतुकीचेही नियमन केले आहे. सुधारित मार्गानुसार निमाणी बसस्थानकाकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या बस काट्या मारुती चौक, संतोष टी पॉईंट, स्वामी नारायण चौक, नांदूरनाका, शिलापूर टोलनाका मार्गे पुढे जातील.
मेळा बसस्थानकाकडून धुळे - जळगावकडे जाणाऱ्या बसेस जुनी जिल्हा परिषद, खडकाळी सिग्नल, सारडा सर्कल, नाशिकरोड परिसरातील मार्गाने पुढे जातील. नवीन सीबीएसकडून पेठ - कळवण - सप्तशृंगगड मार्गांसाठीही स्वतंत्र सुधारित मार्ग निश्चित केला आहे.
महामार्ग बसस्थानकातून शिर्डी, अहिल्यानगर बसफेऱ्यांसाठी मुंबई नाका, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक, साईनाथ सिग्नल, रविशंकर मार्ग, फेम सिग्नल, उपनगर सिग्नल, दत्तमंदिर सिग्नल, सिन्नर फाटा या मार्गाचा वापर होणार आहे.
मुंबईकडे जाणाऱ्या बसेस महामार्ग बसस्थानक, मुंबई नाका, इंदिरानगर बोगदा, लेखानगर, पाथर्डी फाटा, गरवारे पॉईंटमार्गे कसारा व मुंबईकडे जातील. या अधिसूचनेची अंमलबजावणी २२ सप्टेंबर २०२६ ते २९ डिसेंबर २०२६ या कालावधीत करण्याचे नमूद आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी संबंधित बसचालकांनी सुधारित मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई नाका परिसरातील महामार्ग बसस्थानकात एसटी बसची ये-जा सुरक्षित व सुरळीत होण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत सुधारित बदल केले आहेत. नाशिक शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी सुधारित अधिसूचना जारी केली असून, हा बदल १९ सप्टेंबरपासून पुढील आदेश होईपर्यंत लागू राहील.
मुंबई नाका सर्कल हे शहरातील महत्त्वाचे वाहतूक केंद्र आहे. महामार्ग बसस्थानकातून एसटी बाहेर येताना मुख्य रस्त्यावरून बस वळवताना इतर वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम होत असल्याने प्रवेश व निर्गमन मार्गात बदल केला आहे. मुंबई नाका सर्कल येथील बसस्थानक प्रवेशासाठी निश्चित केलेल्या गेटमधूनच एसटी बसला प्रवेश करता येईल. बाहेर जाणाऱ्या एसटी बससाठी संदीप हॉटेल्समोरील गेटचा वापर करून बाहेर पडण्याची व्यवस्था केली आहे.