नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मागील वर्षी ७ मेपासून सुरू झालेला पाऊस नोव्हेंबरपर्यंत सुरू होता. यंदा मात्र जून संपत आला, तरी पावसाची प्रतीक्षा असल्याने, शेतकऱ्यांसह सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून दररोज ढग दाटून येत असल्याने, उष्णतेच्या तीव्रतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
मात्र, पाऊस बरसत नसल्याने, चिंतेचे ढग अधिकच गडद होत आहेत. भारतीय हवामान विभागाने दि. २३ जूनपासून पाऊस महाराष्ट्र व्यापणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार रविवारी (दि. २१) मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या.
मुंबईत पावसाला सुरुवात झाल्यानंतर, पुढील तीन दिवसांत नाशिकमध्ये पावसाला प्रारंभ होत असतो. त्यामुळे नाशिकमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत पावसाचे आगमन होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, ढगाळ वातावरणाने उष्णतेची तीव्रता काहीशी कमी झाली आहे. यंदा नाशिकचे तापमान ४२ अंश सेल्सिअसवर गेल्यामुळे नाशिककरांना यंदाचा उन्हाळा चांगलाच 'ताप'दायक ठरला.
आता ढगाळ वातावरणाने कमाल तापमानात घट झाली असून, गेल्या काही दिवसांपासून तापमान सातत्याने ३५ ते ३६ अंश सेल्सिअसवर स्थिरावत आहे. रविवारी कमाल तापमान ३६.३, तर किमान तापमान २३.२ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.
पाऊस लांबल्याने जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या आहेत. शासनाकडून पेरण्यांची घाई करू नका, असे आवाहन अगोदरच करण्यात आले तर शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागून आहेत. पुढील दोन, दिवसांत पावसाने जोर पकडल्यास, जुलै महिन्याच्या पहिल्या आहे. तीन आठवड्यात पेरण्यांना वेग येऊ शकतो.