Nashik MLC Election Gokul Gite | गोकुळ गिते यांच्या माघारीमागे 'दबावतंत्र' ?

Nashik MLC Election Gokul Gite | गणेश गिते यांच्या प्रकरणातील पत्रव्यवहारामुळे चर्चांना उधाण; महाजनांचा इन्कार
MLC Election
MLC Electionpudhari photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गिते यांच्या माघारीनंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चाना सुरुवात झाली आहे.

MLC Election
Nashik MLC Election | महायुतीत बंडखोरी दराडे-गिते यांच्यात थेट लढत

गिते यांच्या माघारीसाठी केवळ राजकीय मनधरणी करण्यात आली की, त्यासाठी दबावतंत्राचा वापर झाला, याबाबत विविध तर्क-वितर्क केले जात आहेत. गोकुळ गिते यांचे बंधू गणेश गिते यांच्या म्हाडा प्रकरणाशी संबंधित पत्रव्यवहार समोर आल्यामुळे या चर्चांना अधिकच बळ मिळाले आहे.

गेल्या आठ दिवसांपासून गोकुळ गिते यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी महायुतीतील वरिष्ठ नेत्यांकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते. गिते निवडणूक रिंगणात कायम राहिल्यास महायुतीच्या अधिकृत उमेदवाराच्या मतांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे त्यांची मनधरणी करण्यासाठी विविध स्तरांवर हालचाली सुरू होत्या.

दरम्यान, राज्य सरकारच्या कायदेशीर सल्लागार सहसचिवांनी अतिरिक्त सरकारी वकील, उच्च न्यायालय यांना पाठविलेल्या पत्रात गणेश गिते यांना म्हाडा प्रकरणात उच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या अटकपूर्व जामिनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या सूचना करण्यात आल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे, गोकुळ गिते आणि गणेश गिते यांनी १ जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्याच दिवशी गणेश गिते यांच्या जामिनाविरोधातील पत्र प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. हे पत्र ७ मे २०२६ रोजी तयार करण्यात आले असल्याचे सांगितले जात असले, तरी ते १ जून रोजी प्राप्त झाल्याने त्याच्या वेळेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

MLC Election
Nashik - गितेंच्या माघारीसाठी दराडेंची धावाधाव

गिरीश महाजनांचा खुलासा

या संदर्भात प्रतिक्रिया देताना मंत्री गिरीश महाजन यांनी दबावतंत्राच्या आरोपांना फेटाळून लावले. गोकुळ गिते यांनी स्वेच्छेने माघार घेतली असून, त्यांच्यावर कोणतेही दबावतंत्र वापरण्यात आलेले नाही. भविष्यात त्यांच्याबाबत योग्य विचार केला जाईल. म्हाडा प्रकरण हा न्यायप्रविष्ट आणि छोटा विषय आहे. तसेच आता गिते यांना दराडे यांच्याबाबत कोणतीही तक्रार नाही, असे महाजन यांनी स्पष्ट केले.

राजकीय दबावाचा सवाल

या सर्व घडामोडींमुळे गणेश गिते यांच्या कायदेशीर प्रकरणाचा आणि गोकुळ गिते यांच्या माघारीचा काही संबंध आहे का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. गिते यांना माघारीसाठी सुरू असलेले प्रयत्न हे केवळ राजकीय समन्वयाचा भाग होते की, दबावाचे राजकारण, याबाबत चर्चाना उधाण आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news