

नाशिक पुढारी ऑनलाइन | नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्यावर संचालक मंडळाने दाखल केलेला अविश्वास ठराव विशेष सभेत मंजूर करण्यात आला आहे. नवीन सभापती निवडीपर्यंत बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर यांची प्रभारी सभापतीपदी निवड करण्यात आली आहे.
नाशिक बाजार समितीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे पिंगळे यांचा एक गट तर भाजपचे शिवाजी चुंभळे यांचा एक असे दोन गट आहेत. बाजार समितीच्या एप्रिल 2023 निवडणुकीत पिंगळे गटाने 12, तर चुंभळे गटाने 6 जागा जिंकल्या होत्या. सभापती निवडणुकीत चुंभळे गटाने उमेदवार न देता पिंगळे गटाचा मार्ग प्रशस्त केला होता. मात्र, दोन वर्षांतच 15 संचालकांनी पिंगळे यांच्या कारभाराविरोधात तक्रार करत अविश्वास दाखवला आहे. बाजार समितीतील पिंगळे गटाच्या 12 पैकी 9 संचालकांनी बंड पुकारत ते चुंभळे गटाला जाऊन मिळाले आहेत.
माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या नेतृत्वाखालील १५ संचालकांनी सभापतींविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा प्रस्ताव सोमवारी (दि. ३) जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे सादर केला होता. पिंगळे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून हा निर्णय घेतल्याचे संचालकांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आज ११ मार्चला संचालक मंडळाची बैठक बोलावली होती. दरम्यान, देविदास पिंगळे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल करुन चुंभळे यांनी दहा संचालकांना सहलीसाठी विदेशात पाठवले होते. ते सोमवारी सायंकाळी नाशिकमध्ये परतले. आज (दि.11) सर्व संचालक अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी दाखल झाले होते. यावेळी बाजार समितीला पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.
दरम्यान भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी संचालकांना पैसै देऊन फोडल्याचा आरोप देविदास पिंगळे यांनी केला होता. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याची माहितीदेखील पिंगळे यांनी दिली होती. त्यामुळे अजित पवार यांच्या मध्यस्तीने हे बंड थंड करण्यात येईल अशीही चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादीला हे बंड थोपवण्यात अपयश आलं आहे. चुंभळे यांनी हे बंड यशस्वी करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे.