Nashik Market | नाशिकची बाजारपेठ फुलली! गणेशोत्सवात होणार हजारो कोटींची उलाढाल

Nashik Market | 12 दिवसांत होणार हजारो कोटींची उलाढाल : वाहन, सराफ, बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स बाजारात तेजी
Ganeshotsav Market
Ganeshotsav MarketPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लाडक्या गणरायाच्या आगमनाने नाशिकच्या बाजारपेतेलाही चांगलीच झळाळी मिळाली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध वस्तूंच्या खरेदीला उधाण आले असून, पुढील १० ते १२ दिवसांत शहरातील बाजारपेठेत हजारो कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे.

Ganeshotsav Market
Nashik MNREGA | नाशिक जिल्ह्यात मनरेगा मजुरांवर उपासमारीची वेळ; तब्बल 48 कोटी 12 लाखांची देयके प्रलंबित

वाहनांपासून सोने-चांदीच्या दागिन्यांपर्यंत, घरांपासून इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत विविध क्षेत्रांत ग्राहकांचा उत्साह दिसून येत आहे. गेल्या काही काळात ग्राहकांची क्रयशक्ती वाढल्याने आणि बँका व वित्तीय संस्थांकडून कर्ज सहज उपलब्ध होत असल्याने बाजारपेठेला मोठा बूस्ट मिळाला आहे.

गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर नवीन वस्तू किंवा वाहन खरेदी करण्याबरोबरच घर खरेदीलाही ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव व्यापाऱ्यांसाठी चांगली उलाढाल घेऊन येण्याची चिन्हे आहेत.

एकूणच, गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्ताने नाशिकच्या बाजारपेठेत सकारात्मक वातावरण निर्माण केले असून, वाढती क्रयशक्ती, सहज उपलब्ध होणारे कर्ज, आकर्षक वित्तीय योजना आणि सणासुदीची खरेदी यामुळे विविध क्षेत्रांमध्ये मागणी वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात बाजारपेठेतील ही तेजी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

चांदीच्या मोदकांपासून सोन्याच्या हारापर्यंत

गणरायासाठी विशेष दागिने बनविण्याची परंपराही यंदा बाजारपेठेला हातभार लावत आहे. चांदीचे मोदक, दुर्वा, जास्वंदाचे फूल तसेच गणेशमूर्तीसाठी सोने-चांदीचे अलंकार खरेदी करण्याकडे भाविकांचा कल आहे. याशिवाय महिलांनी गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर पारंपरिक दागिन्यांची खरेदी केल्याने सराफ बाजारातही ग्राहकांची गर्दी वाढली आहे. सोन्याचे हार, अंगठ्या, बांगड्या यासह हलक्या वजनाच्या दागिन्यांना विशेष मागणी आहे.

Ganeshotsav Market
Nashik MNREGA | नाशिक जिल्ह्यात मनरेगा मजुरांवर उपासमारीची वेळ; तब्बल 48 कोटी 12 लाखांची देयके प्रलंबित

इलेक्ट्रॉनिक्स बाजारालाही 'बूस्ट'

गणेशोत्सवाच्या निमित्ताने इलेक्ट्रॉनिक्स बाजारातही उत्साहाचे वातावरण आहे. टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन यासह स्वयंपाकघरातील अत्याधुनिक उपकरणांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. विशेषतः डिशवॉशर, एअर फ्रायर, फूड प्रोसेसर यांसारख्या उपकरणांच्या खरेदीकडे गृहिणींचा कल वाढला आहे.

वाहन बाजारात कोटींची उड्डाणे

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहन बाजारात मोठी तेजी निर्माण झाली असून गणेशोत्सवाच्या कालावधीत नाशिकमध्ये सुमारे ७०० ते ८०० चारचाकी आणि सुमारे दोन हजार दुचाकी वाहनांची विक्री होण्याची शक्यता वाहन विक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात आली. आकर्षक वित्तीय योजना, कमी डाउन पेमेंट आणि सहज उपलब्ध होणारे वाहन कर्ज यामुळे ग्राहकांचा वाहन खरेदीकडे कल वाढला असून गणेशोत्सवातील शुभमुहूर्त साधत अनेकांनी वाहनांचे बुकिंग केले आहे.

गणेशोत्सवात फ्लॅट, बंगलोंचीही बुकिंग

गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर नवीन घरात प्रवेश करण्यासोबतच आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घर खरेदीसाठीही ग्राहक पुढे येत आहेत. या कालावधीत सुमारे दोन हजार घरांच्या बुकिंगची शक्यता बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे. तयार घरांना मोठी मागणी असून, निर्माणाधीन प्रकल्पांनाही ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. आपल्या आवडीनुसार घरांतील अंतर्गत सजावट आणि बदल करून घेता यावेत, या उद्देशाने काही ग्राहक निर्माणाधीन प्रकल्पांना पसंती देत आहेत. गृहकर्ज सहज उपलब्ध होत असल्याने घर खरेदीचा निर्णय घेणे ग्राहकांना तुलनेने सोपे झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news