

मनमाड (नाशिक) : निवडणूक आयोगाने शहरातील प्रभाग क्र. १० मधील नगरसेवक पदाची निवडणूक रद्द केली. या प्रभागातील उबाठा शिवसेनेचे उमेदवार नितीन वाघमारे यांचे निधन झाल्यामुळे निवडणूक रद्द करण्यात आली. प्रभागाची निवडणूक रद्द करण्यात आली असली, तरी थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मतदान करण्याचा अधिकार मतदारांना राहणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
निवडणूक रद्द करण्यात आल्यामुळे प्रभागातील इतर उमेदवारांचा मात्र हिरमोड झाला आहे. आता निवडणूक कधी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. प्रभाग १० 'अ' मधून नितीन वाघमारे यांनी उबाठा शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्यासह इतर उमेदवारांनी प्रचार सुरू केला होता.
निवडणूक अंतिम टप्प्यात असताना मंगळवारी (दि. २५) नितीन वाघमारे यांचे निधन झाले. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांसह सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवारांना धक्का बसला. निवडणुकीदरम्यान उमेदवाराचा मृत्यू झाल्यास त्या प्रभागातील निवडणूक रद्द केली जाते. निवडणूक काळात वाघमारे यांचे निधन झाल्यामुळे निवडणूक आयोगाने २ डिसेंबरला होणारी प्रभाग क्र. १० ची निवडणूक रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. आता निवडणूक कधी घेण्यात येईल याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.