

मनमाड : रईस शेंख
मनमाड नगर परिषदेची रणधुमाळी सुरू असतानाच एक दुःखद घटना घडली आहे. प्रभाग क्रमांक 10 अ मधील ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार नितीन वाघमारे (वय 43) यांचे सोमावारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. निवडणुकीच्या धामधुमीत झालेल्या या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नितीन वाघमारे यांनी आपल्या प्रभागात प्रचाराला जोरदार सुरुवात केली होती. मात्र, काल रात्री त्यांना अचानक त्रास जाणवू लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यादरम्यान, हृदयविकाराचा जोरदार झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. वाघमारे यांच्या निधनाची माहिती कळताच विविध राजकीय पक्षांचे नेते आणि पदाधिकारी यांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
या अनपेक्षित घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. वाघमारे यांच्या निधनामुळे प्रभाग क्रमांक 10 अ मधील निवडणूक पुढे ढकलली जाणार का? निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या वाढत्या ताणतणावामुळेच नितीन वाघमारे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आणि शहरात सुरू आहे.