

नाशिक : विकास गामणे
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्रातील कुपोषणाचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. राज्यात सुमारे एक लाख 82 हजार 443 बालके कुपोषित असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या अहवालात देण्यात आली आहे.
नाशिक जिल्हा कुपोषणाच्या बाबतीत राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. एप्रिल महिन्यात जिल्हा परिषदअंतर्गत महिला व बालकल्याण विभागाने राबविलेल्या विशेष मोहिमेत, एकूण 3,848 कुपोषित बालके आढळून आली. यामध्ये 515 बालके तीव्र कुपोषित, तर 3,333 मध्यम कुपोषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, सर्वाधिक 450 बालके नाशिक ग्रामीण भागातील आहेत.
कोरोना काळानंतर, जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींच्या माध्यमातून एकमूठ पोषण आहार योजना राबविल्याने कुपोषणात काहीशी घट झाली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा कुपोषित बालकांची संख्या वाढली. जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी महिला व बालविकास विभागासह शिक्षण विभाग, आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. महिला व बालविकास विभाग, आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून आयआयटी, मुंबई या संस्थेच्या मदतीने 'स्तनपान महत्त्व व पूरक पोषण आहार' हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तर सॅम/ मॅम कुपोषण व्यवस्थापनांतर्गत कुपोषित बालक व पालक यांचा किलबिल मेळावा, कुपोषित बालकांना अतिरिक्त पोषण आहार किट वाटप, बाल अंगणवाडी असे विविध उपक्रमही राबविले गेले. कुपोषित बालकांच्या पालकांना कोंबड्यांचे वाटपदेखील करण्यात आले. मात्र, असे असतानाही अपेक्षित यश येताना दिसत नाही. कुपोषित बालकांची संख्या वाढली. मार्च 2025 अखेर जिल्ह्यात नऊ हजार 852 कुपोषित बालकांची संख्या असून, यात मध्यम कुपोषित बालकांची संख्या 8,944, तर तीव्र कुपोषित बालकांची संख्या 1852 एवढी असल्याचे महिला बालकल्याण राज्याच्या अहवालातून समोर आले.
जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाने कुपोषित बालकांचा शोध घेण्यासाठी 28 एप्रिल ते 10 मे दरम्यान जिल्ह्यात धडक मोहीम राबविण्यात आली. यात जिल्हाभरातील 26 प्रकल्पांतर्गत असलेल्या पाच हजार 121 अंगणवाडी केंद्रांवरील शून्य ते सहा महिने वयोगटातील 24 हजार 641 तर, सात महिने ते सहा वर्षे वयोगटातील तीन लाख 11 हजार 335 अशा एकूण तीन लाख 35 हजार 976 बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये तीन लाख 30 हजार 945 बालके सर्वसाधारण, शून्य ते सहा महिने वयोगटातील 65, सात महिने ते सात वर्षे वयोगटातील तीन हजार 268 बालके मध्यम कुपोषित सापडली आहेत. तर, शून्य ते सहा महिने वयोगटात 29 व सात महिने ते सहा वर्षे वयोगटात 486 बालके तीव्र कुपोषित सापडली आहेत.
दरम्यान, आरोग्य तपासणी मोहिमेत एक हजार 77 बालके स्थलांतरित बालके होती. 10 हजार 235 बालके ही तात्पुरते बाहेरगावी गेलेली आढळून आली. त्यामुळे 11 हजार 312 बालके ही एकूण स्थलांतरित आढळली आहेत. यात सर्वाधिक निफाड (2307), इगतपुरी (1669), नाशिक (748), पिंपळगाव (628), चांदवड-2 (674) प्रकल्पातील बालके स्थलातंरित झालेली आहेत.
शून्य ते सहा वर्षे वयोगटातील सॅम बालकांपैकी 50 बालके ही आरोग्य समस्या, दुर्धर आजाराने ग्रस्त आढळली आहेत. यात नाशिक प्रकल्पात 12, सुरगाणा व इगतपुरी प्रकल्प प्रत्येकी सहा बालके सापडली आहेत.
कमी वयातील बालविवाह, बाळंतपण
गरोदर मातांना अपुरा पोषणयुक्त आहार
रोजगाराची कमी, स्थलांतरित होण्याचे प्रमाण अधिक
निरक्षरता, आरोग्य-शिक्षणाचा अभाव
योजनांची अपुरी अंमलबजावणी