

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या उपनगरांत सर्वाधिक 2 हजार 778 तीव्र कुपोषित बालके असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे, तर राज्यात 1 लाख 82 हजार 443 कुपोषित बालके आढळली असून त्यापैकी 30 हजार 800 बालके गंभीर तीव्र कुपोषणाच्या श्रेणीत आहेत, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी गुरुवारी विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे.
1 लाख 51 हजार 643 बालके मध्यम कुपोषित श्रेणीत आहेतर, असेही या उत्तरात नमूद करण्यात आले आहे. विधानसभेत कुपोषणाच्या संदर्भात 53 आमदारांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात राज्याच्या महिला बाल विकास विभागाने दिलेल्या आकडेवारीतून कुपोषणाचे दाहक वास्तव समोर आले आहे.
पोषण श्रेणीनुसार मुंबई महानगर पालिकेने 6 हजार 92 बालकांच्या पोषण श्रेणीची नोंदच केली नसल्याचे व सर्वाधिक कुपोषित बालके मुंबईच्या उपनगरांत असल्याचे निदर्शनास आले आहे हे खरे आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावरील लेखी उत्तरात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी अंशतः खरे आहे, असे मान्य केले आहे.
मुंबई महापालिकेने नोंद न केलेल्या बालकांची संख्या अधिक असल्याने या बालकांना मदत कशी पोहोचवणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच नोंद न करण्याचे कारण काय, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. ही नोंद करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आहे किंवा नाही याबाबत मुंबई महापालिकेने स्पष्ट सांगितलेले नाही. प्रत्यक्षात नोंद न केलेल्या कुपोषित बालकांची संख्या यापेक्षा अधिक असावी असा अंदाज आहे.
राज्यात अंगणवाडी सेविका व मदतनीसांची सुमारे 3 हजार 602 पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे बालविकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिकांचीही पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्याबाबत कार्यवाही सुरु असल्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे.