

देवळा : जिल्ह्यातील कंत्राटदारांची शासनाकडे कोट्यवधी रुपयांची बिले बाकी असल्याने या कंत्राटदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने याची तात्काळ दखल घेऊन बिले अदा करावीत अशी मागणी आज दि २ रोजी देवळा येथे मालेगाव, कळवण व देवळा तालुक्यातील कंत्राटदारांच्या झालेल्या बैठकीत करण्यात आली. यात देयके मिळण्याची कार्यवाही सुरू न केल्यास 15 ऑगस्ट ला आत्मदहन करण्याचा इशारा उपस्थित देकेदारांनी देत तीव्र नाराजी देखील व्यक्त केली.
विकासाच्या गप्पा मारणाऱ्या महायुती सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्राची आर्थिक कुतरओढ सुरू आहे. लाडक्या बहिणींना महिना १५०० रुपये देण्यासाठी सामाजिक न्याय व आदिवासी विभागाच्या हजारो कोटींच्या निधीवर एकीकडे डल्ला मारला जात आहे. दुसरीकडे तिजोरीत खडखडाट असल्याने पायाभूत सुविधा विकासकामांची हजारो कोटी रुपयांची बिले थकल्याने राज्यातील कंत्राटदारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
सरकारकडे असलेली थकीत बिले मिळावीत यासाठी कंत्राटदारांकडून धरणे आंदोलन, मोर्चे यासारख्या लोकशाही मार्गाने आंदोलने करण्यात आली. मात्र सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन थकीत निधी देण्याबाबत दिला जात नाही. यामुळे राज्यातील कंत्राटदारांनी फेब्रुवारी महिन्यापासून काम बंद आदोलन पुकारले आहे. परिणामी मागील पाच महिन्यांपासून राज्यातील विकासकामे बंद पडली आहेत.
याची राज्य शासनाने दखल घेऊन झालेल्या कामाची बिले तात्काळ अदा करावीत अशी मागणी यावेळी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, मालेगाव शाखेचे अध्यक्ष संदीप भुसे यांनी केली. याप्रसंगी रमेश शिरसाठ, महेंद्र पाटील, रोहित पगार , हेमंत पाटील, वैभव पाटील, समाधान अहिरराव, अजय पगार, विजय गुंजाळ, संजय वाघ, रवी अहिरे, प्रशांत देवरे, विलास सुर्यवंशी, सतीश सोनवणे, प्रशांत सोनवणे, हरीष पाटील , निलेश अमृतकर, दिनेश जाधव, गौरव पाटील, विनित शिरसाठ, शुभम देवरे, शुभम चंदन, जितेंद्र वाघ, नानू रौंदळ, सचिन आहेर आदी ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.