

The three killed the young man by beating him and throwing stones at his face.
मालेगाव (नाशिक) : जुन्या भांडणाची कुरापत काढून शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या जुना मुंबई- आग्रा रोडवरील सुझुकी शोरूमजवळ तिघांनी युवकाला मारहाण करीत व चेहर्यावर दगड टाकून खून केला.
नितीन अर्जुन निकम उर्फ रितिक (25, रा. आयेशानगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून तो मालेगाव महापालिकेत कंत्राटी कामगार होता. नितीन हा गुरुवारी (दि. 31) रात्री 12.45 च्या सुमारास नानावटी पेट्रोल पंपाजवळ उभा असताना दुचाकीवरून आलेल्या सचिन अहिरे उर्फ कच्या माया, परेश फुलचंद पगारे व केतन अजय अहिरे (सर्व रा. मालेगाव) या तिघांनी त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच चाकूने वार करून तिघांपैकी एकाने बाजूला असलेला दगड त्याच्या चेहर्यावर टाकून खून केला. त्यानंतर हे तिघे जण तेथून पळून गेले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. नितीनचा भाऊ शुभम निकम याने दिलेल्या फिर्यादीवरून छावणी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सचिन, परेश व केतन यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस सीसीटीव्हीच्या फुटेजवरून चौकशी करीत आहेत. या आठवड्यात गोळीबार, धारदार शस्त्राने मारहाण व आता खून झाल्याने शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.