

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मागील चार दिवसांपासून नाशिकचे कमाल तापमान सातत्याने ३८ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदविले जात आहे. मालेगावचे तापमान ४३.२ अंशांपर्यंत पोहोचले. किमान तापमान २०.४ अंश नोंदवले गेले. तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज असल्याने, नाशिककरांना आणखी तीव्र तापमानाचा सामना करावा लागणार आहे.
भारतीय हवामान विभागाने यापूर्वीच पुढील चार दिवसांत राज्यात उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.
त्यामुळे नाशिकचे तापमान देखील ४० अंश सेल्सिअसवर नोंदविले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सूर्याचा प्रकोप बघावयास मिळत असल्याने, नाशिककर घराबाहेर पडणे टाळत आहेत. दुपारच्या सुमारास उन्हाच्या झळा असह्य होत असल्याने, शहरातील मुख्य रस्ते निर्मुष्य होत आहेत.
मालेगावला उष्णतेची लाट कायम
शहरासह परिसरात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, बुधवारी (दि. १५) तापमान ४३.२ अंशांपर्यंत पोहोचले. किमान तापमान २०.४ अंश नोंदवले गेले. सकाळपासूनच कडक उन्हाची चाहूल लागली होती.
दुपारनंतर उष्णतेचा तडाखा अधिक जाणवला. यापूर्वी सोमवारी (दि.१३) शहरातील तापमान ४२ अंश सेल्सिअस होते. मंगळवारी (दि.१४) तापमानात किंचित घट होत ते ४१.६ अंशांवर आले होते. मात्र, बुधवारी तापमानात पुन्हा १.६ अंशाची वाढ होत ते ४३.२ अंशांवर पोहोचले.