

मालेगाव ( नाशिक ): महापालिका निवडणुकीची रणधुमाळी जोमात सुरू झाली आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचा सपाटा सुरू केला आहे. पश्चिम भागातील सुमारे 20 ते 22 जागांसाठी शिवसेनेकडे 150 हून अधिक, तर भाजपकडे 100 हून अधिक इच्छुक उमेदवार आहेत. आजवर येथील परिस्थिती व इच्छुकांची संख्या पाहता भाजप-शिवसेना युती होणार नाही, अशीच चर्चा होती. प्रदेश पातळीवरून सूत्रे हालल्यानंतर युतीच्या चर्चेचा धसका दोन्ही पक्षांतील इच्छुकांनी घेतला आहे.
गत महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे 13, तर भाजपचे 9 उमेदवार विजयी झाले होते. अशा स्थितीत युती झाल्यास अनेक इच्छुकांवर गंडांतर येणार असून, मातब्बरांनादेखील धीर धरावा लागणार आहे. स्थानिक पदाधिकारी युतीच्या मानसिकतेत नाहीत. मुंबई, नाशिक येथील महापालिका ताब्यात घेण्यासाठी व महायुती एकसंघ असल्याचे दाखविण्यासाठी भाजपनेच युतीसाठी स्वत:हून पुढाकार घेतल्याने अनेकांची पंचाईत झाली आहे. प्रदेश पातळीवरील नेते युतीचा आदेश देऊन मोकळे होतील.
तथापि, स्थानिक नेत्यांना इच्छुकांची समजूत घालताना नाकीनऊ येईल. यातूनच युती झाल्यास दोन्ही पक्षांना मोठ्या बंडखोरीचा सामना करावा लागेल. याउलट ज्या मातब्बरांची उमेदवारी निश्चित आहे अशांनी युती झाली, तर चांगलेच. आपला विजय हमखास होईल. असे गणित मांडत युतीसाठी देव पाण्यात ठेवले आहेत. यामुळे निवडणुकीतील खर्चातही बचत होईल, असा मातब्बरांचा होरा आहे. दरम्यान, काही प्रभागांत इच्छुकांची संख्या विक्रमी असल्याने दुधाची तहान ताकावर या उक्तीप्रमाणे आपल्याला नाही, तर पत्नीला, श्री नाही, तर सौ या मार्गाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
नाशिकमध्ये युती झाल्यास मालेगावीदेखील महापालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती होऊ शकते, असा कयास आहे. गेल्या दोन महापालिका निवडणुकांपासून पश्चिम भागात भाजप-शिवसेना अशी आमने सामने लढत होत आहे. युती झाल्यास निवडणुकीची ती रंगतच संपुष्टात येणार आहे. इच्छुक उमेदवारांची संख्या बघता काहीही झाले, तरी निवडणुकीचे मैदान गाजवायचेच, अशा तयारीने काही उमेदवारांनी प्रचार पत्रके वाटपही सुरू केले. ‘एकला चलो रे’ असे म्हणत त्यांनी आपला मार्ग निवडला आहे.