

मनमाड (नाशिक) : रईस शेख
नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्ष पदावर शिवसेनेचे योगेश पाटील यांनी बाजी मारली. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या उबाठा गटाचे प्रवीण नाईक यांचा २ हजार १५५ मतांनी पराभव केला. पाटील यांना १७ हजार ४०७ तर नाईक यांना १५ हजार २६४ मते मिळाली.
नगराध्यक्ष पदाच्या एका जागेसाठी ८ उमेदवार रिंगणात होते. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातर्फे रवींद्र घोडेस्वार यांना पराभव पत्करावा लागला. त्यांना ६ हजार ९४८ मते मिळाली. नगरसेवक पदाच्या ३१ पैकी २१ तर त्यांचे मित्र पक्ष भाजपने १ आणि आरपीआयने २ जागा जिंकून पालिकेत पूर्ण बहुमत मिळवले. कॉंग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. भाजपने तब्बल १५ वर्षानंतर एक जागा जिंकली. एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या मनमाड शहरात या पक्षाला नगरसेवक पदाच्या फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे निकाल जाहीर होताच समर्थकांनी एकच जल्लोष केला. पालिकेच्या ३१ जागांसाठी २ डिसेंबरला मतदान झाले होते. १९ दिवसानंतर मतमोजणी करण्यात आली. शहरातील आययूडीपी भागातील पालिका इमारतीत पोलिस बंदोबस्तात एव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या होत्या. रविवारी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू झाली.
नगराध्यक्ष पदासाठी पहिल्या फेरीत उबाठाचे प्रवीण नाईक यांनी आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या फेरीपासून शिवसेनेच्या योगेश पाटील यांनी शेवटच्या ११ व्या फेरीपर्यंत आघाडी टिकवून ठेवत विजय मिळवला. निकाल जाहीर होताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख फरहान खान यांना खांद्यावर घेत एकच जल्लोष केला. या निवडणुकीत शिवसेनेने २१, उबाठा शिवसेना ४, भाजप १, आरपीआय २, कॉंग्रेस व अपक्ष एका जागेवर विजयी झाले. सकाळी अप्पर पोलिस अधीक्षक तेजबीरसिंग संधू यांनी भेट दिली. पोलिस निरीक्षक विजय करे यांनी नियोजन केले होते. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मालेगावचे प्रांत नितीन सदगीर आणि पालिकेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी काम पाहिले.