Nashik |महायुतीसमोरील संकट टळलं ?

नाशिक : गोकुळ गितेंच्या मनधरणीत यश आल्याचा दावा
MLC Election
MLC Electionpudhari photo
Published on
Updated on

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीसमोर उभे ठाकलेले संकट टळले आहे. भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन व शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांची शिष्टाई अखेर यशस्वी ठरली असून, अपक्ष गोकुळ गिते यांचे बंड शमविण्यात यश आल्याचा दावा केला जात आहे. यासंदर्भात गुरुवारी (दि.११) पत्रकार परिषदेत अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे भाजप-शिवसेनेकडून सांगण्यात आले. गिते यांनी पाठिंबा दिल्यास महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा विधान परिषदेवर पुन्हा जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

विधान परिषदेची निवडणूक नाशिक मतदारसंघात महायुतीला नाकीनव आणणारी ठरली आहे. अपक्ष उमेदवार गोकुळ गिते विरुद्ध संपूर्ण महायुती असे या निवडणुकीस स्वरूप प्राप्त झाल्यानंतर गिते यांच्या माघारीसाठी महायुतीने जंगजंग पछाडले. माघारीची मुदत उलटल्यानंतरही महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना गिते यांनी पाठिंबा जाहीर करावा, यासाठी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन, शिवसेनेचे मंत्री उदय सामंत, दादा भुसे यांनी गिते बंधूंची भेट घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात यश मिळू न शकल्याने अखेर हा वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात गेला. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गणेश गिते, गोकुळ गिते हे बुधवारी मुंबईकडे रवाना झाले.

MLC Election
Nashik Slow Simhastha Works | सिंहस्थ कामे कासवगतीने; भाविकांसाठी अडथळ्यांची शर्यत

मुख्यमंत्री हे दिल्ली दौऱ्यावर असल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गिते बंधू रात्री उशिरापर्यंत मुंबईतच होते. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांच्या सेवासदन या शासकीय निवासस्थानी गणेश गिते, गोकुळ गिते यांची बैठक पार पडली. मंत्री उदय सामंतदेखील या बैठकीस उपस्थित होते.

या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून, गिते दराडेंना पाठिंबा देणार असल्याचा दावा भाजप, शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. त्यांसदर्भात गुरुवारी मंत्र्यांच्या उपस्थितीत गोकुळ गितेंची पत्रकार परिषद होणार असल्याचा दावा केला जात आहे. परंतु, यासंदर्भात गोकुळ गितेंकडून मात्र दुजोरा मिळाला नाही.

MLC Election
Nashik Metro Route-नाशिक मेट्रोचा मार्ग अखेर खुला! नियमित मेट्रोसाठी निओ मेट्रोचेच मार्ग कायम ठेवले जाणार

गोकुळ गिते यांचे दराडेंवर टीकास्र

मुंबई भेटीपूर्वी गोकुळ गिते यांनी महायुतीचे उमेदवार दराडे यांच्यावर टीकास्र डागले. नरेंद्र दराडे यांनी सहा वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात कुठलेही काम केलेले नाही, असा आरोप करताना दराडे निष्क्रिय असल्यामुळे मतदारच मला निवडणूक लढण्यासाठी सांगत आहेत. सोशल मीडियावर माझा बाप काढायचा आणि नंतर दिलगिरी व्यक्त करायची ही कोणती संस्कृती ? असा सवालही गिते यांनी केला. जर मला मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दिल्लीला जाण्यास सांगितले, तर तिथे जाणेही क्रमप्राप्त आहे, असेही त्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news