

नाशिक : महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या पंचवर्षिक निवडणुकीत उमेदवारांची भाऊगर्दी झाल्यानंतर बिनविरोध निवडणूक करण्याच्या प्रयत्नास प्रतिसाद मिळाला नाही. शुक्रवारी (दि. ३१) माघारीच्या अंतिम दिवशी २१ जणांनी माघार घेतली. त्यामुळे १७ जागांसाठी आता ४३ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. नाशिकमधून मंत्री नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर यांचे पुत्र वामन खोसकर, माजी आमदार जे. पी. गावित यांचे पुत्र इंद्रजित गावित, माजी आमदार शिवराम झोले रिंगणात आहेत.
पुणे रायगड अहिल्यानगर गटातून आठ उमेदवारांनी माघार घेतल्याने वैभव पिचड तसेच अमरावती गटातून आमदार केवळराम काळे यांचे एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने दोघांचीही बिनविरोध निवड झाली. आदिवासी विकास महामंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. सन २०१० नंतर होणाऱ्या निवडणुकीत विक्रमी अर्ज प्राप्त झाले. नऊ गटांसह दोन महिला राखीव अशा १७ जागांसाठीच्या निवडणुकीत ६४ उमेदवारांनी ९९ अर्ज दाखल केले. नाशिक गटातून ९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
सर्वाधिक १० अर्ज महिला गटातून प्राप्त झाले. १७ ऑॅक्टोबरला अर्ज छाननीनंतर १७ जागांसाठी ६४ उमेदवारांचे ९९ अर्ज शिल्लक होते. शुक्रवारी माघारीचा अंतिम दिवस होता. यात २१ उमेदवारांनी माघार घेतली. यात माजी आमदार निर्मला गावित, जे. पी. गावित, विनायक माळेकर, कमळ माळेकर, भरत गावित यांचा समावेश आहे. ३ नोव्हेंबरला चिन्ह वाटप होईल. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहनिबंधक संभाजी निकम, सहायक निवडणूक अधिकारी संतोष बिडवई, वैभव मोरडे काम बघत आहे. १४ नोव्हेंबरला मतदान होणार असून, १६ नोव्हेंबरला मतमोजणी होईल.
पिचड, काळे यांची बिनविरोध निवड
पुणे रायगड अहिल्यानगर गटातून ८ अर्ज दाखल होते. माजी आमदार वैभव पिचड यांनी समजूत काढत माघारीची फिल्डिंग लावली. परिणामी, सर्व ७ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे पिचड यांचा एकमेव अर्ज राहिला. अमरावती गटातून ५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यात आमदार केवळराम काळे यांना सर्व उमेदवारांची माघार घेण्यात यश आले. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली.
माघारीसाठी रंगले नाट्य
निवडणुकीची सर्व सूत्रे मंत्री झिरवाळ यांच्याकडे होती. त्यामुळे मंत्री झिरवाळ विश्रामगृहावर सकाळपासून ठाण मांडून होते. नाशिकच्या उमेदवारीचा तिढा सोडण्यासाठी मोठी दमछाक झाली. आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांच्याशीही चर्चा केली. परंतु, त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे गोकुळ झिरवाळ यांच्यासह आमदार खोसकर यांचे पुत्र वामन खोसकर यांच्यात लढत रंगणार आहे.