

नाशिक : तब्बल 15 वर्षानंतर होत असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या पंचवर्षिक निवडणुकीत माघारीच्या अंतिम दिवशी उमेदवारांच्या माघारीचा घोळ सुरू राहिल्याने 17 जागांसाठी 41 उमेदवार रिंगणात आहेत. माघारीनंतर पॅनल तयार होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, ही शक्यता धूसर झाली. सोमवारी (दि. 3) रिंगणातील 41 उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे. दुपारी चिन्ह प्राप्त झाल्याने उमेदवारांकडून आता प्रचाराला सुरुवात झाली आहे.
सोमवारी (दि.3) माघारीच्या दिवशी वेळेत माघार होऊ शकलेली नाही. मात्र, या निवडणुकीत मी माघार घेत असल्याचे उमेदवार वामन खोसकर यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे जाहीर केले आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या 17 जागांसाठी सन 2010 नंतर निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी यंदा इच्छूकांची मोठी भाऊगर्दी झाली होती. नऊ गटांसह दोन महिला राखीव अशा एकूण 17 जागांसाठी 64 उमेदवारांनी 99 अर्ज दाखल झाले होते.
माघारीच्या अंतिम दिवशी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, नितीन पवार यांनी प्रयत्न केले. दिवसभर चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. मात्र, एकमत होऊ न शकल्याने माघारीचा घोळ अंतिम क्षणापर्यंत सुरू राहिला. यात केवळ दोन जागा बिनविरोध होऊ शकल्या. त्यामुळे आता 17 जागांसाठी 41 उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांना सोमवारी चिन्हांचे वाटप करण्यात आले. यात नाशिक गटातील प्रमुख उमेदवार गोकुळ झिरवाळ यांना रोडरोलर, इंद्रजीत गावित यांना आॅटोरिक्षा, वामन खोसकर यांना एअर कंडीशनर, शिवराम झोले जीपगाडी, पालघर गटातील सुनील भुसारा यांना मोरपीस चिन्ह प्राप्त झाले आहे.