

नाशिक : महापालिकांच्या निवडणुकांसाठी महायुती करण्याबाबत पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतिम निर्णय घेतील. नाशिक महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणारच असा दावा शालेय शिक्षण मंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांनी केला आहे. त्यामुळे निवडणूकीत महायुती होणार की नाही, याबाबत आता सस्पेन्स निर्माण झाला आहे.
राज्यातील महापालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणुकांच्या संदर्भात शिवसेना पदाधिकारी, इच्छुक उमेदवार, नगरसेवक यांची बैठक शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिक्षण मंत्री दादा भुसे, शिवसेना सचिव राम रेपाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्यांसाठी राबविलेल्या योजनांमुळे विधानसभेत मोठे यश मिळाले. महापालिका निवडणुकीतही यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे सचिव राम रेपाळे यांनी सांगितले. महायुतीचे निर्णय हे शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे साहेब घेतील, तरी शिवसेना सर्वच्यासर्व १२२ जागा लढवण्यासाठी सज्ज असल्याचे उपनेते, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी सांगितले.
यावेळी आमदार सुहास कांदे, किशोर दराडे, उपनेते अजय बोरस्ते, विजय करंजकर, माजी खासदार हेमंत गोडसे, संपर्क प्रमुख विकास शिंदे, सह संपर्क प्रमुख चंद्रकांत लवटे, महानगर प्रमुख प्रविण तिदमे उपस्थित होते. या बैठकीत आगामी निवडणुकांची रणनीती, संघटनात्मक मजबुती, प्रभाग निहाय आढावा, प्रचार यंत्रणा, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, अंगीकृत संघटना यांचे प्रमुख पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित होते.
घराघरात शिवसेना संदेश पोहोचविणार
पक्ष संघटना अधिक बळकट करून 'घराघरात शिवसेना' हा संदेश पोहोचवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. तसेच आगामी काळात विविध प्रभागांमध्ये बैठका, जनसंवाद कार्यक्रम व संघटनात्मक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.