

नाशिक पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवार निवडण्यात महायुतीला विलंब होत आहे. कधी भुजबळांचे नाव समोर येते तर कधी गोडसे मुख्यमंत्र्यांना भेटून आश्वासन घेतात तर कधी भाजपचे पदाधिकारी जागेवर आपला दावा ठोठावतात. मात्र, दुसरीकडे महाविकास आघाडीने पंधरा दिवसांपुर्वीच उमेदवाराची घोषणा करत प्रचार सुरु केला आहे. जिल्ह्यात एक वॉर रुम तयार करत सोशल मिडीया प्रचारात देखिल त्यांनी आघाडी घेतली आहे. गुरुवार (दि. ४) रोजी महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये याचे नियोजन देखिल करण्यात आले आहे. Nashik Lok Sabha Election 2024
काळ बदलत चालला असल्याने काळासोबत प्रचार करण्याच्या पद्धतींमध्ये अमुलाग्र बदल झाल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे. पुर्वी रिक्षा, टेम्पो या द्वारे प्रचार केला जात होता मात्र आता लोकांच्या हातात स्मार्ट फोन आल्याने त्याद्वारे प्रचार करण्याचा ट्रेंड सुरु झालेला आहे. स्मार्ट प्रचारामध्ये सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्हिडीओ, रील्स, फोटो, फ्लायर्स तयार करुन प्रचार करण्यात येत आहे. Nashik Lok Sabha Election 2024
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट असे पक्ष सामावलेले आहेत. जिल्ह्यामध्ये असलेल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी युट्युब, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपद्वारे उमेदवाराची माहिती देण्यात येत आहे. यामध्ये कन्टेंट अतिशय महत्वाचा समजला जातो. कमी वेळात आपल्या उमेदवाराबाबत जास्तीत जास्त माहीती जनतेपर्यंत कशी पोहचवायची ही कला सध्याच्या तरुणाईकडे आहे. त्यामुळे हा वॉररुम हाताळण्यासाठी आता तरुणाईच काम करत आहे.
आपल्या उमेदवाराने मतदारसंघात केलेली कामे, आघाडीची भुमिका, उमेदवाराची प्रतिमा वाढविणे अशा विविध प्रकारांतून सोशल मिडीयाद्वारे मतदारांचे मन वळविण्याचा प्रयत्न याद्वारे करता येत आहे.
प्रचार काळात बड्या नेत्यांच्या सभा मतदारसंघात होतात. या सोशल मिडीयाच्या व्यासपीठावरून या सभा जनतेला दाखविण्यात येतात. आर्टीफिशल इंटेलिजन्सचा वापर करत ठराविक क्षेत्रापुरतेच त्याला पसरविण्याची मुभा देखिल सोशल मिडीयावर असते.
ट्विटरवरुन जगभरात पोहचता येते. ठराविक शब्द मर्यादेमध्ये भावना व्यक्त करण्यासाठी ट्विटर हे प्रभावी माध्यम ठरत आहे. इन्स्टाग्रामचा वापर करुन उमेदवाराचे रील्स, स्टोरीज तसेच लाईव्ह ग्रुप जोडता येतात. तसेच मतदारसंघानिहाय व्हॉट्सॲपचा वापर करुन ग्रुप प्रचार करण्यात येत आहे
आजकालच्या युगात अत्याधुनिक पद्धतीने प्रचार करणे महत्वाचे आहे. तरुण पिढीला सोशल मिदियावरून उमेदवाराबाबत माहिती देणे गरजेचे असल्याने वॉर रूमची उभारणी करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक मतदारापर्यंत राजाभाऊ वाजे यांची माहिती पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. – सुधाकर बडगुजर, जिल्हाध्यक्ष, उबाठा गट
हेही वाचा –