नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क – लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी शहरा तसेच ग्रामीण भागातूनही उत्स्फूर्तपणे मतदारांचा प्रतिसाद मिळत असून मतदारांनी सकाळपासून मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लावल्या आहेत.
नाशिक लोकसभेसाठी हेमंत गोडसे, राजाभाऊ वाजे आणि शांतीगिरी महाराजांमध्ये लढत होणार आहे.
गैरप्रकार रोखण्यासाठी पथके
जिल्ह्यात मतदान प्रक्रियेवेळी गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने विविध पथके तैनात केली आहेत. ही पथके मतदारांना दारू, पैसा, वस्तू वाटप व अन्य गैरप्रकार राेखण्याकरिता कार्यरत असतील. या मध्ये ४४ भरारी पथके आहेत. याशिवाय ८२ स्थायी पथके, २४ चलचित्र सर्वेक्षण पथके, १२ चलचित्र निरीक्षण पथके आणि १६ आंतरजिल्हा, आंतरराज्य तपासणी नाक्यांवर पथके नियुक्त केली आहेत. भरारी व स्थायी पथकांमध्ये केंद्रीय पोलिस दलाच्या सदस्यांचा समावेश आहे.
सार्वजनिक सुटी
मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सोमवारी (दि.२०) भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उद्योग विभागांतर्गतचे सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांनाही सुटी लागू असणार आहे. तसेच ज्या आस्थापनांना सुटी देणे शक्य नाही तेथे कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्याकरिता किमान दोन तासांची सवलत देणे बंधनकारक असेल. मात्र, त्याकरिता जिल्हा प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. मतदारांना योग्य ती सुटी किंवा सवलत न मिळाल्याने मतदान करणे शक्य झाले नाही, अशी तक्रार आल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.