Nashik MLC Election 2026 | विधान परिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

Nashik MLC Election 2026 | ६१९ मतदार उद्या बजावणार मतदानाचा हक्क; मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि वेबकास्टिंगची सुविधा
MLC Election
MLC Electionpudhari photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

उमेदवारी अर्ज दाखल न करता महाविकास आघाडीने दाखविलेल्या हाराकिरीनंतरही महायुतीतील बंडखोरीमुळे लादल्या गेलेल्या विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी (दि.१८) मतदान होत आहे. एकीकडे बंडखोरांच्या माघारीनंतरही पराभवाची धास्ती कायम असलेल्या महायुतीने या निवडणुकीसाठी कमालीची सतर्कता बाळगली असता दुसरीकडे प्रशासनानेदेखील मतदान प्रक्रियेची जय्यत तयारी केली आहे.

MLC Election
Nashik MLC Election | महायुतीत बंडखोरी दराडे-गिते यांच्यात थेट लढत

या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील नऊ मतदान केंद्रांवर ६१९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत, पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी, यासाठी सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि वेबकास्टिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, संपूर्ण मतदान प्रक्रियेवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष राहणार आहे.

बुधवारी (दि. १७) मतदान साहित्याचे वितरण करण्यात येणार असून, मतदान कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. मतदान सकाळी ८ ते सायं. ४ या वेळेत होणार आहे. या निवडणुकीत बॅलेट पेपरद्वारे पसंतीक्रम मतदान पद्धतीने मतदान घेतले जाणार आहे. या निवडणुकीत नाशिक व मालेगाव महापालिकेसह एक छावणी परिषद, ११ नगर परिषदा आणि ६ नगरपंचायतींमधील मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये नाशिक महापालिकेचे सर्वाधिक १२२, तर मालेगाव महापालिकेचे ८४ सदस्य सहभागी होणार आहेत. मतदानानंतर २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

MLC Election
Local Body Constituency Election : लातूर-बीड-धाराशिव मतदारसंघ : पुन्हा रंगणार प्रतिष्ठेची रणधुमाळी

गिते, हिरे मतपत्रिकेवर कायम

या निवडणुकीने सुरुवातीपासूनच राजकीय रंगत निर्माण केली आहे. महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्यानंतर भाजपचे गणेश गिते आणि प्रसाद हिरे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्याचवेळी गणेश गिते यांचे बंधू गोकुळ गिते यांनीदेखील अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने राजकीय समीकरणांमध्ये मोठी खळबळ उडाली होती.

बंडखोरांच्या माधारीसाठी राज्याचे मंत्री उदय सामंत, दादा भुसे आणि गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये बैठका व चर्चाचा धडाका लावला होता. प्रसाद हिरे यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर गोकुळ गिते यांच्यावरही माघारीसाठी दबाव वाढला. अखेरीस त्यांनी प्रचारातून माघार घेत असल्याची घोषणा केली. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर ही घोषणा झाल्याने त्यांचे नाव मतपत्रिकेवर कायम राहणार आहे. त्यामुळे मतदानावेळी मतांचे नेमके गणित काय जुळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नऊ मतदान केंद्रांवर मतदान

नाशिक तहसील कार्यालयात नाशिक, भगूर आणि देवळाली छावणी परिषदेच्या सदस्यांचे मतदान होणार आहे. दिंडोरी तहसील कार्यालयात दिंडोरी व पेठ, इगतपुरी तहसील कार्यालयात इगतपुरी व त्र्यंबकेश्वर, निफाड तहसील कार्यालयात निफाड, पिंपळगाव बसवंत, ओझर व सिन्नर येथील सदस्य मतदान करतील. येवला तहसील कार्यालयात येवला, नांदगाव आणि मनमाड येथील सदस्यांसाठी मतदान केंद्र असेल. याशिवाय मालेगाव, चांदवड, कळवण आणि बागलाण तहसील कार्यालयांमध्ये संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांसाठी स्वतंत्र मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news