

मखमलाबाद : गावातील पाटाजवळ तसेच गंधारवाडी, गंगावाडी, काकड मळा आदी ठिकाणी दिवसाढवळ्या बिबट्या मादी बछड्यासह मुक्त संचार करत असल्याने नागरिकांमध्ये तसेच स्थानिक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यामुळे शेतीची कामे करणे मुश्कील झाले आहे. बुधवारी (दि. 11) रात्री पाटालगतच्या रस्त्यावर या बिबट्या मादीने शेतकऱ्याच्या समोर अगदी रुबाबात चालत येत दर्शन दिले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाटाजवळ राहात असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना शाळेत जाताना व परत येताना जीव मुठीत घेऊन वावरावे लागते. सध्या बिबट्या मादी तिच्या तीन बछड्यांसह मुक्त संचार करत आहे. मळ्यांतील प्रत्येक घराजवळ हा बिबट्या सध्या रात्री चकरा मारत आहे. परिसरातील शेतकरी गौतम तिडके, नितीन काकड, पंकज शिंदे, सुरेश नामाडे, तानाजी नामाडे आदींनी बिबट्याला दिवसाढवळ्या समोरून जाताना पाहिले आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी मोबाइलवर बिबट्याचे फोटो तसेच व्हिडिओ व्हायरल केले आहेत. वनविभागाने पाटाजवळ पिंजरा ठेवला असला, तरी त्यात ऐवज नसल्याने बिबट्या पिंजऱ्याकडे फिरकत नाही. पिंजऱ्यात बोकड ठेवायचा खर्च कोणी करायचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या परिसरातील इमारती, रो हाउस, बंगल्यातील रहिवासी हे बिबट्याच्या मुक्त संचारामुळे भीतीच्या छायेत आहेत. या ठिकाणी रोज जॉगिंग, व्यायाम तसेच रनिंग करणारे विद्यार्थी मखमलाबाद पाटालगतच्या रस्त्यावर येत नाहीत.
गंधारवाडीत बुधवारी रात्री या मादी बिबट्याने दोन शेळ्या फस्त केल्या. या बिबट्याने मळ्यातील एकही कुत्रा शिल्लक ठेवला नाही. मारलेल्या श्वानांचे सांगाडे शेतात आढळतात.