

देवळा (नाशिक) : तालुक्यातील महालपाटणे येथे शनिवारी (दि १५ ) रोजी बिबट्याने हल्ला चढवत बैल फस्त केल्याने पशू पालकांमध्ये खबराट पसरली असून, वन विभागाने याची तात्काळ दखल घेऊन या बिबट्याच्या बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, देवळा तालुक्यातील महाल पाटणे येथे शनिवारी दि १५ रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास दोन बिबट्यांनी शेतकरी सुभाष भारती यांच्या मालकीच्या बैलावर हल्ला चढवत बैल ठारकेल्याची घटना घडली आहे. याठिकाणी गेल्या पंधरा दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात एक गाय ठार झाली आहे . आता परत या बिबट्याने बैल ठार केल्याने शेतकऱ्यामध्ये खबराट पसरली असून, वन विभागाने याची दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा बसविण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
यासंदर्भात शनिवार (दि.15) आज रोजी महाल पाटणे येथील ग्रामस्थांनी देवळा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात जाऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा तसेच ठार झालेल्या बैलाचा पंचनामा करून भरपाई मिळावी अशी मागणी केली.
दरम्यान, तालुक्यात बहुतांश गावांत बिबट्यांची दहशत वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. शेतकऱ्यांनी आपली व जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाने केले असून, शेतात व वस्ती करून राहणारे शेतकरी बिबट्याच्या भीतीपोटी पिकांना पाणी देण्यासाठी घराबाहेर पडत नसल्याचे बोलले जात आहे. मात्र वनविभागाने देखील याची दखल घेऊन बिबट्याच्या बंदोबस्त करण्यासाठी ठिकठिकाणी पिंजरा लावून ग्रामस्थांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.