

निफाड ( नाशिक ) : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा संचार वाढला असून १२ गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुंदेवाडी, देवगाव, नांदूरमधमेश्वर, कसबे सुकेणे, रानवड, मरळगोई, भाऊसाहेबनगर, शिरवाडे-वाकद, चाटोरी, खेडलेझुंगे, सोनगाव आणि निफाड या गावांमध्ये बिबट्यांचे नियमित दर्शन होत आहे. काही ठिकाणी पाळीव जनावरांवर हल्ले झाल्याने ग्रामस्थ अधिक घाबरले आहेत.
सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू असल्याने बिबट्यांचा वावर वाढला आहे. शेतकरी दिवसरात्र शेतात काम करतात, त्यामुळे त्यांच्यात मोठी भीती आहे. अनेक गावांत सूर्यास्तानंतर लोक बाहेर पडणे टाळत असून जणू अघोषित संचारबंदी सारखेच चित्र दिसून येत आहे. बिबट्याच्या पाऊलखुणा आणि हालचाली सातत्याने दिसत असल्याने सावधगिरी आणखी वाढवण्यात आली आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत वन विभागाने संवेदनशील भागांमध्ये १९ पिंजरे लावले आहेत. विशेष पथकांकडून दिवस-रात्र गस्तही सुरू आहे. वनपाल जयप्रकाश शिरसाठ यांनी ग्रामस्थांना सुरक्षेच्या महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. ते म्हणाले, शेतात जाताना मोठ्याने बोलत जायचे, सोबत घुंगराची काठी ठेवायची. लहान मुलांना एकटे बाहेर सोडू नये आणि कोणतीही हालचाल दिसताच लगेच वन विभागाशी संपर्क साधावा. बिबट्याचा शोध आणि पकड मोहीम युद्धपातळीवर सुरू असून वन विभागाने नागरिकांना शांत राहण्याचे, परंतु सतर्कता न सोडण्याचे आवाहन केले आहे.