

Wani Police Action Elderly Woman Death
वणी : लखमापूर गावालगतच्या तलावात हात-पाय बांधलेल्या अवस्थेत ७० वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडवून देणाऱ्या हत्याकांडाचा वणी पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणी सागर गणपत गांगोडे (२६, रा. भनवड) आणि सुनील दत्तू गांगोडे (२५, रा. म्हेळुस्के) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
६ सप्टेंबररोजी दुपारी लखमापूर गावालगतच्या तलावात मंदाकिनी सोनवणे यांचा हात-पाय बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. वृद्ध महिलेची हत्या करून मृतदेह तलावात टाकण्यात आल्याचे समोर आल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गंभीर स्वरूपाच्या या गुन्ह्याचा तातडीने तपास करून आरोपींना जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.
दरम्यान, वणी पोलिस ठाण्यात रुजू झाल्याच्या पहिल्याच दिवशी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड यांनी या हत्येच्या तपासाची सूत्रे हाती घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून उपलब्ध पुरावे, तांत्रिक माहिती आणि विविध तपासाच्या दिशांचा मागोवा घेतला.
गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी संशयितांपर्यंत धागेदोरे जोडले. तपासाअंती सागर गांगोडे आणि सुनील गांगोडे यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
वृद्ध महिलेचे हात-पाय बांधून तिचा मृतदेह तलावात टाकण्यात आल्याने या घटनेबाबत नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते. पोलिसांनी अल्पावधीत दोन्ही संशयितांना अटक केल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान, हत्येमागील नेमके कारण, गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि या घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी काय आहे, याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलिस करीत आहेत.