

नाशिक : लाडकी बहिण योजनेतंर्गत राज्यात २६ लाख बोगस लाभार्थी असून यात नाशिक जिल्ह्यात एक लाख ८६ हजार ८०० बोगस लाभार्थी सापडले आहे. या बोगस लाभार्थींवर नेमकी काय कारवाई केली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात लाडकी बहिण योजनेवर झालेल्या चर्चेतून बोगस लाभार्थीची संख्या समोर आली आहे.
गतवर्षी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांच्या बँक खात्यावर दरमहा १५०० रुपये सरकारकडून देण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५ लाख ७४ हजार ४०९ बहिणींचे अर्ज महिला आणि बालविकास विभागाला ऑनलाइन पद्धतीने प्राप्त झाले होते. त्यापैकी ७ लाख ३८ हजार ५५६ महिलांचे अर्ज ॲपद्वारे तर ८ लाख ३५ हजार ८५३ अर्ज पोर्टलद्वारे जिल्ह्यात प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ९५ टक्के म्हणजे १४ लाख ९६ हजार अर्ज मंजूर झाले आहे.
७९ हजार अर्ज निकषात बसत नसल्याने अपात्र ठरले होते. पात्र ठरलेल्या १४ लाख ९६ हजार लाडकी बहिणींना दर महिन्याला १५०० रुपये प्राप्त होत आहे. परंतु, शासनाकडून आता योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. यात पुरुष लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याचे समोर आले. महिलांच्या नावाने १४ हजार ९९८ पुरुषांनी दरमहा १५०० रुपये प्रमाणे १० महिने लाभ घेतला. त्यामुळे एकूण बोगस लाभार्थ्यांची संख्या २६ लाख इतकी असून त्यापोटी ५१३६ कोटी ३० लाख रुपये जे पुरुषांना गेले ते सरकार परत घेणार आहे का, असा प्रश्न अधिवेशनात आमदार सुनील प्रभू यांनी केला. प्रभू यांनी यावेळी जिल्हानिहाय बोगस लाभार्थींची यादीच वाचून दाखवत बोगस लाभार्थ्यांवर कारवाईची मागणी केली.
जिल्हानिहाय बोगस लाभार्थी
पुणे - २ लाख ४ हजार
ठाणे - १ लाख ३५ हजार ३००
अहिल्यानगर - १ लाख २५ हजार ७५६
नाशिक - १ लाख ८६ हजार ८००
कोल्हापूर - १ लाख १४ हजार
मुंबई उपनगर - १ लाख १३ हजार
नागपूर - ९५ हजार ५००
रायगड - ६३ हजार
बीड - ७१ हजार
लातूर - ५९ हजार