नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक दैनंदिन शहरातील कचऱ्यात प्रतिदिन दोनशे मे. टनापर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची क्षमता ११०० मे. टनापर्यंत प्रतिदिन वाढविण्यात येणार असून प्रकल्पातील प्रिसॉर्टिंग, कंपोस्टिंग, आरडीएफ युनिटमध्ये अतिरिक्त यंत्रसामग्री बसविण्याचे काम सुरू असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार पंकज भुजबळ यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे.
मनपाच्या पाथर्डीस्थित घनकचरा प्रकल्पाबाबत आ. पंकज भुजबळ यांनी विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित केला. मनपा क्षेत्रात दररोज जमा होणारा ८०० ते ८५० मेट्रिक टन घनकचरा कोणत्याही शास्त्रीय प्रक्रियेविना पाथर्डी डेपोमध्ये टाकला जात असून, पाथर्डी येथील 'कचरा प्रक्रिया प्रकल्पाची' मूळ क्षमता ही वाढत्या नागरीकरणामुळे अपुरी पडत आहे.
येथील यंत्रसामग्री वारंवार नादुरुस्त असल्यामुळे परिसरात दुर्गंधी व प्रदूषणाची समस्या निर्माण होत असल्याची तक्रार आ. भुजबळ यांनी विधिमंडळात मांडली. त्याला उत्तर देताना शिंदेंनी सिंहस्थाच्या निमित्ताने अतिरिक्त २०० मेट्रिक टनावर प्रक्रिया करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
मनपाने शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करणे व विल्हेवाट लावणेकामीचा प्रकल्प सन २०१७ पासून खासगी यंत्रणेमार्फत चालविण्यात येत आहे. त्यानंतर वेळोवेळी आवश्यक मशीनरी पुरवठा करून व आनुषंगिक कामे करून सद्यः स्थितीत प्रकल्पाची क्षमता सुमारे ९०० मे. टन प्रतिदिन इतकी करण्यात आली आहे. सद्यःस्थितीत शहरातून दररोज सुमारे ७५० ते ८०० मे. टन प्रतिदिन कचरा जमा केला जातो. प्रकल्पाची पुरेशी क्षमता असून, दैनंदिन येणाऱ्या संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत असल्याने परिसरात दुर्गंधी व प्रदूषणाची समस्या उद्भवत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
'वेस्ट टू एनर्जी'चा प्रस्ताव नाही
मनपामार्फत कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती करण्यासाठी 'वेस्ट टू एनर्जी' अथवा मटेरिअल रिकव्हरी फॅसिलिटी उभारण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केलेला नाही. सिंहस्थ विचारात घेता मनपामार्फत प्रकल्प क्षमता वाढविणेकरिता वरीलप्रमाणे आवश्यक कार्यवाही करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.