

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाची ओळख राष्ट्रीय पातळीवरही निर्माण करण्यासाठी ध्वजारोहण सोहळ्याच्या मुहूर्तावर कुंभमेळा प्राधिकरणाच्या माध्यमातून भारतीय टपाल विभागाच्या विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात येणार आहे.
या तिकिटावर नाशिकचे प्रमुख धार्मिक स्थळ असलेल्या रामकुंडाचे आकर्षक चित्रण केले आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त तयार केलेल्या या विशेष टपाल तिकिटाच्या डिझाइनमध्ये रामकुंड, गोदावरी नदी, धार्मिक विधी तसेच नाशिकच्या आध्यात्मिक परंपरेचे दर्शन घडवले आहे.
तिकिटाच्या वरील भागात 'रामकुंड तीर्थ, नाशिक' असा उल्लेख असून, खाली 'सिंहस्थ महाकुंभ २०२७' अशी नोंद आहे. त्यामुळे हे तिकीट सिंहस्थ कुंभमेळ्याची स्मृती जपणारे ठरणार आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासन आणि कुंभमेळा प्राधिकरणाकडून विविध पातळ्यांवर तयारी सुरू आहे.
पायाभूत सुविधा, साधुग्राम, वाहतूक, स्वच्छता, सुरक्षा आणि भाविकांसाठीच्या सुविधांबरोबरच कुंभमेळ्याची सांस्कृतिक ओळख देशभर पोहोचविण्यावरही भर दिला जात आहे. यातच ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त होणारे विशेष टपाल तिकिटाचे अनावरण सिंहस्थाच्या तयारीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या माध्यमातून नाशिकच्या धार्मिक परंपरेला टपाल तिकिटाच्या स्वरूपात राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळणार असल्याने हे तिकीट सिंहस्थाच्या स्मृतींचा महत्त्वपूर्ण ठेवा ठरणार आहे.
कुंभमेळ्याच्या प्रचार आणि तयारीचा भाग म्हणून भारतीय हवाई दलाच्या प्रसिद्ध 'सूर्यकिरण' एरोबॅटिक टीमचा विशेष एयर शो नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर करण्याचे नियोजन नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाने केले आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील ध्वजारोहण सोहळ्यानंतर लगेचच म्हणजे दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी नाशिक ते त्र्यंबकेश्वर या मार्गावर एकाच वेळी दोन्ही ठिकाणांना कव्हर करीत ही टीम प्रात्यक्षिके करणार आहे.
ध्वजारोहण सोहळ्यापूर्वी कुंभमेळा प्राधिकरणाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी २६ ऑक्टोबर २०२६ रोजी विक्रमी शंखनाद करणार असून, यात ३०३ हून अधिक भाविक भक्तगण शंखनाद करून या सोहळ्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करतील, असे नियोजन सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाने केले आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या माध्यमातून अधिकृत कुंभगीत तयार करण्यात येणार असून, या गीताला प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांचे संगीत लाभणार आहे. ध्वजारोहण सोहळ्याच्या नियोजन बैठकीतील सादरीकरणात या 'कुंभ गीता'ची माहिती देण्यात आली. भाविकांसाठी भक्ति, संस्कृती आणि भव्यतेचा संगम असलेले हे कुंभगीत अजय-अतुल संगीतबद्ध करणार आहेत.
मात्र, या गीताची रचना आणि गायन कोण करणार याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्याचप्रमाणे कुंभगीतात समावेश होणाऱ्या बाबीविषयीही अंतिम निर्णय झालेला नाही. यापूर्वी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थाच्या लोगो आणि पंचमुखी त्र्यंबकराजा मूर्तीवरून निर्माण झालेला वाद लक्षात घेता, प्रशासन याविषयी अधिक सावध भूमिका घेत आहे.
त्यामुळे कुंभगीत निश्चित करताना कोणताही वाद निर्माण होऊ नये, यासाठी सर्वांगीण विचार केला जाणार आहे. या गीताला अंतिम रूप देण्यापूर्वी साधू-महंत आणि आखाडा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनाही विश्वासात घेतले जाणार आहे. त्यांच्या सूचना आणि भावना लक्षात घेऊनच गीत प्रसिद्ध केले जाईल, अशी माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली.
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याच्या कालावधीत एक दिवस रामकुंडावर 'दिव्य संध्या' हा भव्य आध्यात्मिक कार्यक्रम होणार आहे. यामध्ये पवित्र गोदा आरती, भक्तिसंगीत, रोषणाई आणि प्रकाशयोजना यांच्या माध्यमातून रामकुंड घाट उजळून निघणार आहे. कुंभच्या दिव्य भावाने संध्याकाळ भारावून जाईल, असे नियोजन सादरीकरणात दाखवण्यात आले. हा उपक्रम सिंहस्थ काळात रोज होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.