

नाशिक (पुढारी वृत्तसेवा):
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या विविध विकासकामांना मजुरांच्या अनुपस्थितीचा फटका बसला आहे. सण साजरा करण्यासाठी परप्रांतीय तसेच राज्यातील ग्रामीण भागातून नाशिकमध्ये कामासाठी आलेले बांधकाम मजूर, कामगार आणि कुशल कारगार हे आपापल्या गावी परतल्यामुळे अनेक प्रकल्पांच्या ठिकाणी शुकशुकाट दिसत आहे.
परिणामी, शहर आणि परिसरात सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या तयारीतील अनेक कामांचा वेग मंदावला असून, काही ठिकाणी कामे जवळपास थप्प झाली आहेत.शहरातील रस्ते, पूल, घाट, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, सुशोभीकरण तसेच अन्य पायाभूत सुविधांची कामे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हाती घेण्यात आली आहेत.
या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता आहे. मात्र, दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे कामगार गावी गेल्याने बांधकाम यंत्रणा आणि ठेकेदारांसमोर मनुष्यबळाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी केवळ यंत्रसामग्री उभी असून, कामाच्या ठिकाणी मोजकेच कामगार दिसत आहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणीपूर्वी सर्व आवश्यक विकासकामे पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे. मात्र, सध्या निर्माण झालेली कामांची संथ गति पाहता, निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दिवाळीनंतर कामगार पुन्हा कामावर रूजू झाल्यानंतर कामाना किती वेग मिळतो, यावरच प्रकल्पांच्या प्रगतीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
विशेष म्हणजे, कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक कामांची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाला करावी लागलेली धावपळ लक्षात घेता, आगामी मुख्य पर्वणीच्या वेळीही अशी स्थिती निर्माण होणार का, अशी चर्चा नाशिककरांमध्ये सुरू झाली आहे.सिंहस्थ कुंभमेळा जवळ येत असताना विकासकामांना गती देणे, आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करणे आणि प्रत्येक कामाचे वेळापत्रक काटेकोर राबवणे हा कुंभमेळा प्राधिकरण आणि संबंधित यंत्रणांसमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे कामगार परतल्यानंतर कामाचा वेग वाढवण्यासाठी प्राधिकरणाकडून कोणती पावले उचलली जातात याकडे आता नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
नियोजन का कस लागणार सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी आवश्यक असलेले कुशल-अकुशल मनुष्यबळ, मजुरांची उपलब्धता, ठेकेदारांचे नियोजन आणि कामांच्या टप्प्यांचे व्यवस्थापन या बाबी आता महत्त्वाच्या ठरणार आहेत. सणानंतर कामगारांची उपलब्धता कितपत राहते आणि कामांचा वेग वाढवण्यासाठी प्रशासन काय उपाययोजना करते, यावर विकासकामांची पुढील वाटचाल अवलंबून असेल.
वेळापत्रकाचे पुनर्नियोजन आवश्यक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या प्रकल्पांचा विभागनिहाय आढावा घेऊन प्राधान्यक्रम निश्चित करणे गरजेचे आहे. विलंब होण्याची शक्यता असलेल्या कामांसाठी अतिरिक्त मनुष्यबळ, आवश्यक यंत्रसामग्री आणि समन्वय यंत्रणा उपलब्ध करणे महत्त्वाचे ठरणार आहे. अन्यथा शेवटच्या टप्प्यात कामांचा ताण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.