

नाशिक (पुढारी वृत्तसेवा): जिल्ह्यात थंडीचा प्रभाव हळूहळू वाढू लागला असून, पहाटेच्या वेळी गारठा अधिक जाणवू लागला आहे. निफाडमध्ये गुरुवारी (दि. १२) ११.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली, तर नाशिक शहरात पारा १३.९ अंशांपर्यंत खाली आला. गेल्या तीन दिवसांपासून तापमानात चढ-उतार सुरू असला, तरी किमान तापमानात घट होत असताना दिसत आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही नागरिक गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत.
शहरात १० नोव्हेंबर रोजी किमान तापमान १४.८ अंश सेल्सिअस होते. त्यानंतर ११ नोव्हेंबरला त्यात घट होऊन १४.२ अंशांची नोंद झाली. गुरुवारी पुन्हा पारा घसरून १३.९ अंशांवर पोहोचला. म्हणजेच तीन दिवसांत शहराच्या किमान तापमानात ०.९ अंशांची घट झाली.
दुसरीकडे निफाडमध्येही थंडीचा कडाका वाढत असून, १० नोव्हेंबरला १२.५ अंश असलेले किमान तापमान ११ नोव्हेंबरला १०.१ अंशांपर्यंत खाली आले. गुरुवारी त्यात किंचित वाढ होऊन ११.३ अंशांची नोंद झाली. तरीही जिल्ह्यातील सर्वाधिक गारठा निफाड परिसरातच अनुभवायला मिळत आहे.
विशेष म्हणजे, पहाटे आणि सकाळच्या सुमारास मोकळ्या परिसरात, नदीकाठच्या भागात तसेच ग्रामीण भागात थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे. सकाळी घराबाहेर पडणारे नागरिक, मॉर्निंग वॉल्कसाठी जाणारे ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे.
रात्री उशिरा आणि पहाटे हवेत गारवा जाणवत असला, तरी सकाळी सूर्यप्रकाश पडल्यानंतर वातावरणामधील थंडी कमी होत आहे. दरम्यान, यंदा ऑक्टोबर महिन्यातही उन्हाचा तडाखा कायम राहिल्याने थंडीचे आगमन काहीसे उशिराने झाले.
मात्र, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून किमान तापमानात घट होऊ लागल्याने हिवाळ्याची चाहूल लागली आहे. नाशिककरांना आता गुलाबी थंडीचा आनंद घेता येत असून, आगामी दिवसांत तापमानातील बदलांकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
किमानमध्ये घट, कमाल स्थिर!
किमान तापमानात घट होत असताना कमाल तापमान मात्र अजून ३२ ते ३३ अंशंच्या आसपास कायम आहे. गुरुवारी नाशिक शहरात कमाल तापमान ३२.९ अंश, तर निफाडमध्ये ३३ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. त्यामुळे पहाटे थंडी आणि दुपारचा उन्हाचा चटका, असे संमिश्र वातावरण सध्या जिल्ह्यात अनुभवायला मिळत आहे.