Nashik Kumbh Mela | सिंहस्थासाठी 260 कोटींच्या आरोग्य आराखड्याला मान्यता

Nashik Kumbh Mela | 136 ठिकाणी आरोग्य सुविधा ; 3,600 अतिरिक्त मनुष्यबळ तैनात होणार
Medical Education
Medical Education
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिंहस्थ महाकुंभमेळ्यात नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेऊन, उपचाराची सुविधा केवळ रुग्णालयापुरती मर्यादित न ठेवता, भाविकांच्या गर्दीच्या ठिकाणीच वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे करण्यात आले आहे.

Medical Education
Nashik Ring Road | नाशिक रिंगरोडच्या कामाला मोठा वेग; मध्यवर्ती कारागृहाची 3 एकर जागा MSIDC कडे हस्तांतरित!

यासाठी महापालिका आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि प्रादेशिक संदर्भ रुग्णालय यांच्या २६० कोटी रुपयांच्या आरोग्य आराखड्यांना नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने प्रशासकीय मान्यता दिली.

तात्पुरती रुग्णालये व दवाखाने, रुग्णवाहिका, अतिरिक्त मनुष्यबळ, आयसीयू क्षमता, औषधे, वैद्यकीय उपकरणे, रोगनियंत्रण आणि डिजिटल आरोग्य निरीक्षण अशा विविध बाबींचा या आराखड्यात समावेश आहे. सिंहस्थाच्या काळात विविध ठिकाणी एकूण १३६ तात्पुरत्या आरोग्य सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये तात्पुरती रुग्णालये, आयसीयू आणि दवाखान्यांचा समावेश आहे.

साधुग्राम, पार्किंग परिसर, घाट, होल्डिंग व स्टेजिंग एरिया, बाह्य पार्किंग तसेच प्रमुख मार्गांच्या परिसरात या सुविधा उभारल्या जाणार आहेत. त्यामुळे किरकोळ आजार, दुखापत किंवा प्राथमिक उपचारांची गरज असलेल्या भाविकांना मुख्य रुग्णालयापर्यंत जाण्याची आवश्यकता कमी होणार आहे.

या सुविधा पोर्टा-कॅबिन स्वरूपात उभारल्या जाणार असून, त्यामध्ये आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि मूलभूत सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वाढीव आरोग्य सुविधांसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यावरही विशेष भर देण्यात आला आहे. चार आरोग्य यंत्रणांच्या आराखड्यांनुसार एकूण ३,६०० अतिरिक्त वैद्यकीय व निमवैद्यकीय मनुष्यबळ तैनात केले जाणार आहे.

पर्वणीसाठी १९० रुग्णवाहिका

भाविकांना आवश्यकतेनुसार तातडीने पुढील उपचार केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी १९० रुग्णवाहिका उपलब्ध राहणार आहेत. यामध्ये ॲडव्हान्स लाइफ सपोर्ट आणि बेसिक लाइफ सपोर्ट रुग्णवाहिकांचा समावेश असेल. रुग्णालये, तात्पुरती आरोग्य केंद्रे, घाट, साधुग्राम, पार्किंग, होल्डिंग व स्टेजिंग एरिया, प्रमुख मार्ग आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी या रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहेत.


१,९४५ खाटांची एकत्रित उपचार क्षमता

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर विविध आरोग्य यंत्रणांच्या माध्यमातून रुग्णालयीन उपचार क्षमता वाढवण्यात येणार आहे. सध्या उपलब्ध असलेल्या १,३०५ खाटांमध्ये आणखी ६४० खाटांची भर पडणार असून, सिंहस्थाच्या काळात एकूण १,९४५ खाटांची उपचार क्षमता उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये १८५ आयसीयू खाटांचा समावेश असेल.

Medical Education
Nashik Municipal Corporation | धूरफवारणीत हलगर्जीपणा भोवला! नाशिक महापालिकेची पेस्ट कंट्रोल ठेकेदारांवर 25 लाखांची दंडात्मक कारवाई

आजारांचे डिजिटल निरीक्षण

सिंहस्थाच्या काळात विविध भागांत नोंदविल्या जाणाऱ्या आजारांची माहिती डिजिटल पद्धतीने संकलित करून रोगनिहाय निरीक्षण करण्याची व्यवस्था प्रस्तावित आहे. यामुळे एखाद्या भागात विशिष्ट आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्यास त्याचा वेळेत मागोवा घेता येणार आहे. रुग्णवाहिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी जीपीएस आधारित ट्रॅकिंग, आरोग्य केंद्रांमधील डिजिटल नोंदणी आणि आपत्कालीन संपर्क व्यवस्थेचाही समावेश आराखड्यात आहे.

विद्यमान रुग्णालयांची उपचार क्षमताही वाढविणार

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय आणि आरोग्यशाळा रुग्णालय या चार प्रमुख रुग्णालयांमध्ये ७३ अतिरिक्त आयसीयू खाटा उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे या चार रुग्णालयांची एकत्रित आयसीयू क्षमता १७ वरून ९० खाटांपर्यंत, तर एकूण खाटांची क्षमता ३५० वरून ५५० पर्यंत वाढणार आहे.

"सिंहस्थ काळात भाविकांना त्यांच्या जवळच वैद्यकीय सेवा मिळावी, गरज भासल्यास रुग्णांना कमीत कमी वेळेत पुढील उपचारासाठी हलवता यावे आणि वाढलेल्या रुग्णसंख्येला सामावून घेण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम असावी, या उद्देशाने विविध विभागांच्या क्षमतांचे एकत्रित नियोजन करण्यात आले आहे."

- शेखर सिंह, आयुक्त, नाशिक महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news