

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीदरम्यान महिला आखाड्यांच्या सहभागाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, सिंहस्थ ध्वज शिलान्यास पूजन सोहळ्यात सहभागी होण्यापासून पोलिसांनी रोखल्याचा गंभीर आरोप महिलांच्या एकमेव परी आखाड्याच्या प्रमुख साध्वी त्रिकाल भवंता यांनी केला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या भवंता यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी करत प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना साध्वी त्रिकाल भवंता यांनी सांगितले की, ८ जून रोजी त्यांनी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. यावेळी आगामी सिंहस्थात महिला संत आणि महिला आखाड्यांना योग्य सन्मान व प्रतिनिधित्व दिले जाईल, अशी ग्वाही मंत्री महाजन यांनी दिली होती.
तसेच सिंहस्थ ध्वज शिलान्यास सोहळ्यात सहभागी होण्यासाठी त्यांनी स्वतः निमंत्रण दिले होते. या आश्वासनावर विश्वास ठेवून त्या आपल्या भक्तांसह कार्यक्रमासाठी गोदाघाटाकडे खाना झाल्या होत्या. मात्र, कार्यक्रमस्थळी पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अडवून ठेवले. कोणतेही स्पष्ट कारण न देता कार्यक्रमात जाण्यास मज्जाव करण्यात आला. एवढेच नव्हे तर दिवसभर घरी स्थानबध्द करून ठेवले गेले.
या कृतीमुळे केवळ आपलाच नव्हे तर, महिला आखाड्यांच्या धार्मिक अधिकारांचाही अवमान झाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या घटनेमुळे आपल्याला मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आपण कुंभमेळामंत्री गिरीश महाजन तसेच सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महिला आखाड्यांना दुय्यम स्थान का ?
महिला संतांना समान संधी मिळावी, अशी मागणी करताना साध्वी त्रिकाल भवंता म्हणाल्या की, देशाच्या संसदेत महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा विचार होत आहे. विविध क्षेत्रांत महिला नेतृत्व करत आहेत. अशा परिस्थितीत सनातन धर्माच्या आणि कुंभमेळ्यासारख्या सर्वोच्च धार्मिक पर्वात महिला आखाड्यांना दुय्यम स्थान का दिले जाते, हा प्रश्न उपस्थित होतो. महिला संतांच्या सहभागात अडथळे निर्माण करणे हे धार्मिक समतेच्या तत्त्वालाच बाधा पोहोचवणारे असल्याचे त्यांनी सांगितले.