

Khaki Uniform Dream and Marriage
नाशिक : महाराष्ट्र पोलिस अकादमीत वर्षभराचे कठोर प्रशिक्षण पूर्ण करताना अनेक प्रशिक्षणार्थीनी पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न साकारले. मात्र, याच प्रशिक्षणादरम्यान फुललेल्या एका प्रेमकहाणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वर्दीचे स्वप्न पूर्ण करतानाच दोन प्रशिक्षणार्थीनी प्रेमाच्या नात्यालाही आयुष्यभराची साथ देण्याचा निर्णय घेत विवाहबंधनात अडकण्याचा योग साधला.
सातारा जिल्ह्यातील अमृता माया सुभाष जाधव (२२) आणि धाराशिव जिल्ह्यातील सिद्धेश्वर बबिता भरत मते (२३) हे महाराष्ट्र पोलिस अकादमीत पोलिस उपनिरीक्षक प्रशिक्षणास दाखल झाले होते. प्रशिक्षण काळात दोघांमध्ये संवाद वाढत गेला. समान समाज, जुळणारे विचार आणि एकमेकांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल निर्माण झालेल्या आदरामुळे त्यांची मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. कठोर शारीरिक प्रशिक्षण, वर्गातील अभ्यास, मैदानी उपक्रम आणि शिस्तबद्ध दिनचर्येत एकमेकांना दिलेल्या प्रोत्साहनातून त्यांचे नाते अधिक दृढ होत गेले.
अमृता यांनी पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षकपदाला गवसणी घातली. सिद्धेश्वर यांनी तिसऱ्या प्रयत्नांत हे यश मिळविले. प्रशिक्षणादरम्यान अमृता या शारीरिक चाचण्या, कवायती आणि विविध उपक्रमांत नेहमी आघाडीवर असत. त्यांची मेहनत, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि कामाप्रति असलेली निष्ठा सिद्धेश्वर यांना भावली. त्यातूनच दोघांमध्ये जवळीक वाढली. प्रशिक्षणातील अनेक आव्हानात्मक टप्प्यांमध्ये त्यांनी एकमेकांना मानसिक आधार दिला. काही काळानंतर सिद्धेश्वर यांनी आपल्या भावना अमृता यांच्यासमोर व्यक्त केल्या. अमृता यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर दोघांनी आपल्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. दोन्ही कुटुंबीयांनी या नात्याला संमती दिल्यानंतर विवाहाची बोलणी सुरू झाली. सहा महिन्यांपूर्वी दोघे विवाहबद्ध झाले.
विशेष म्हणजे, विवाहानंतरही दोघांनी प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित ठेवत आपले उद्दिष्ट साध्य केले. अमृता या बी. कॉम. पदवीधर असून, त्यांनी यापूर्वी कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रमाची तयारीही केली होती. दुसरीकडे, शेतीव्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील सिद्धेश्वर यांनी अनेक अडचणींवर मात करीत पोलिस उपनिरीक्षकपदाचे स्वप्न पूर्ण केले. ग्रामीण भागातून आलेल्या या दोघांनी जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर यश मिळविले आहे.
दोघेही पोलिस सेवेत दाखल होण्याच्या उंबरठ्यावर उभे असून, कर्तव्य, शिस्त आणि प्रेम यांचा सुंदर संगम त्यांच्या आयुष्यात पाहायला मिळत आहे. अकादमीतील ही प्रेमकहाणी सध्या सहकारी प्रशिक्षणार्थी आणि अधिकाऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवक-युवर्तीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. वर्दीच्या स्वप्नाबरोबरच जीवनसाथीची निवड करीत त्यांनी प्रेम आणि कर्तव्याचा आदर्श समतोल साधल्याची भावना व्यक्त होत आहे.