

नाशिक : निखिल रोकडे
सध्या अवयवदानाबद्दल जागरूकता निर्माण झाली आहे. मृत्यूपश्चात आपल्या देहाचा उपयोग इतरांना झाला पाहिजे, या दृष्टीने नागरिकही पुढे येत आहेत. याचाच भाग म्हणून अलीकडच्या काळात नेत्रदानाबद्दल जागरूकता निर्माण होऊन त्यामध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
मानवी जीवनात डोळ्यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. जगातील रंग, निसर्गाचे सौंदर्य, आप्तस्वकीयांचे चेहरे आणि दैनंदिन जीवनातील प्रत्येक क्षण अनुभवण्यासाठी दृष्टी ही अत्यंत महत्त्वाची असते. मात्र, अनेक व्यक्ती कॉर्नियाच्या विकारांमुळे अंधत्वाला सामोरे जातात. अशा वेळी मृत्यूनंतर केलेले दृष्टिदान त्यांच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आणण्याचे काम करते. त्यामुळेच दृष्टिदानाला सर्वश्रेष्ठ दानांपैकी एक मानले जाते. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत दृष्टिदान आणि कॉर्निया प्रत्यारोपणाबाबत जनजागृती वाढत असल्याचे दिसत आहे.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात २०२३ मध्ये १,७५१, २०२४ मध्ये २,७३६ तर २०२५ मध्ये २,८०५ आल्या. या वाढत्या आकडेवारीमुळे दृष्टिदान चळवळीला अधिक बळ मिळत असल्याचे चित्र आहे. दृष्टिदान म्हणजे मृत्यूनंतर व्यक्तीच्या डोळ्यातील पारदर्शक भाग अर्थात कॉर्निया (बुबुळ) काढून तो कॉर्नियाच्या आजारामुळे दृष्टी गमावलेल्या रुग्णात प्रत्यारोपित करणे होय. या प्रक्रियेमुळे अंधत्वग्रस्त व्यक्तीला पुन्हा दृष्टी मिळू शकते. विशेष म्हणजे एका दात्याच्या दोन्ही डोळ्यांतील कॉर्नियाचा उपयोग दोन वेगवेगळ्या रुग्णांसाठी करता येतो. त्यामुळे एका व्यक्तीचे दृष्टिदान दोन कुटुंबांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश निर्माण करू शकते.
राज्यात राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नेत्रपेढ्या, नेत्रसंकलन केंद्रे आणि कॉर्निया प्रत्यारोपण केंद्रांचे विस्तृत जाळे कार्यरत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, जळगाव, अमरावती या शहरांमध्ये कॉर्निया प्रत्यारोपणाच्या सुविधा उपलब्ध आहेत. शासकीय रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये तसेच स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून दृष्टिदान चळवळ अधिक प्रभावीपणे राबविली जात आहे.
राज्यातील प्रमुख नेत्रपेढ्यांमध्ये आय बँक को-ऑर्डिनेशन अँड रिसर्च सेंटर (मुंबई), एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल आय बँक (पुणे), भारती आय बँक आणि सूरज आय बँक यांचा समावेश होतो. या संस्थांमार्फत डोळ्यांचे संकलन, साठवण आणि प्रत्यारोपणाची प्रक्रिया केली जाते. नेत्रतज्ज्ञांच्या मते, मृत्यूनंतर ६ ते ८ तासांच्या आत डोळे संकलित करता येतात. ही प्रक्रिया अवघ्या १५ ते २० मिनिटांत पूर्ण होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या प्रक्रियेमुळे मृतदेहाचे विद्रूपीकरण होत नाही. अंत्यसंस्कार किंवा धार्मिक विर्धीवर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे दृष्टिदानाबाबत समाजात असलेले गैरसमज दूर होणे आवश्यक आहे.
देशात सुमारे १० लाखांहून अधिक नागरिक कॉर्नियल अंधत्वाने ग्रस्त असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. मात्र, उपलब्ध कॉर्नियांची संख्या गरजेपेक्षा कमी असल्याने अनेक रुग्णांना प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी दृष्टिदानाची प्रतिज्ञा करणे ही काळाची गरज झाली आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मृत्यूनंतरही दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्याची संधी प्रत्येकाला उपलब्ध आहे. यासाठी केवळ स्वतःची इच्छा पुरेशी नसून, कुटुंबीयांनाही दृष्टिदानाबाबत माहिती देणे आवश्यक आहे. जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त समाजात अधिक जागरूकता निर्माण होऊन दृष्टिदानासाठी पुढाकार घेणाऱ्यांची संख्या वाढावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दृष्टिदानाबाबत महत्त्वाच्या गोष्टी
कोणतीही व्यक्ती दृष्टिदान करू शकते.
दृष्टिदानासाठी वयाची कोणतीही मर्यादा नाही.
मृत्यूनंतर ६ ते ८ तासांच्या आत डोळ्यांचे संकलन.
दृष्टिदानामुळे मृतदेहाचे विद्रूपीकरण होत नाही.
अंत्यसंस्कार, धार्मिक विधींत कोणताही अडथळा नाही.
कुटुंबीयांची संमती अत्यावश्यक असते.
कॉर्निया प्रत्यारोपणामुळे अंधत्वग्रस्तांना नवजीवन
महाराष्ट्रातील कॉर्निया प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
शस्त्रक्रियांची संख्या
२०२३ - १,७५१
२०२४ - २,७३६
२०२५ - २,८०५