

नाशिक : काठे गल्ली परिसरातील अतिक्रमित सातपीर बाबा दर्गा काढण्यावरून जमावाने पोलिसांसह दर्ग्याच्या विश्वस्थांवर तुफान दगडफेक केल्याची घटना बुधवारी (दि. १६) मध्यरात्री घडली. या दगडफेकीत २१ पोलिस जखमी झाले असून तीन शासकीय व एक खासगी वाहनाचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी तपास करीत याप्रकरणी १४ जणांना अटक केली आहे, तर एका विधीसंघर्षीत मुलास ताब्यात घेतले आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १९ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अतिक्रमित सातपीर बाबा दर्गा विरोधात उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. मात्र दर्गा विश्वस्तांना दर्गासंदर्भात कागदपत्रे सादर करता न आल्याने त्यांनी स्वत:हून अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शहर पोलिसांनी खबरदारी म्हणून दर्गा परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, ही बाब नागरिकांना समजल्यानंतर मंगळवारी (दि. १५) रात्रीपासून दर्गाजवळ जमाव होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे शहर पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला. तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. दर्गा विश्वस्तांनीही जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावाने हिंसक होत मध्यरात्री १२ नंतर पोलिसांसह विश्वस्तांवर दगडफेक केली. काही क्षणात पखालरोड परिसरात तणाव झाला. मात्र पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज करीत पांगवले. तरीदेखील जमाव नियंत्रणात येत नसल्याने पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावास पांगवले. दरम्यान, या दगडफेकीत २१ पोलिस जखमी झाले असून तीन शासकीय वाहने व एक खासगी वाहनाचे नुकसान झाले. परिसरातील रस्त्यावर दगडांचा खच पडला होता. जमावातील काही जणांनी इमारतीच्या गच्चीवरून पोलिसांच्या दिशेने दगडफेक केल्याचेही उघड झाले. पोलिसांनी तातडीने धरपकड करीत १५ संशयितांना ताब्यात घेतले. तसेच परिसरातील ७० वाहने ताब्यात घेतली असून त्यावरून संशयितांची ओळख पटवली जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश वाहने शहरातील इतर भागांमधील असल्याचे समजते. त्यामुळे ही दंगल पुर्वनियोजित असल्याचा संशय बळावला आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मनपाच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी (दि. १६) सकाळी सहा वाजेपासून अतिक्रमण मोहीम राबवली. सकाळी ११ पर्यंत अतिक्रमित भाग संपुर्ण काढण्यात आला. यात महापालिकेने चार जेसीबी, सहा ट्रक, दोन डंपरसह ४० ते ५० अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. कारवाईस्थळी पोलिसांनी तेथे बंदोबस्त कायम ठेवला आहे.
न्यायालयाने अनधिकृत दर्गा काढण्याचे आदेश दिल्यानंतर पदाधिकारी स्वत:हून अतिक्रमण काढत होते. मात्र, दुसऱ्या गटाने अतिक्रमण काढण्यास विरोध करत पोलिसांवर दगडफेक केली. या मागे षडयंत्र आहे का, हल्लेखोरांकडे दगड कोठून आले, यामागे कोण आहे, याचा शोध घेतला जाईल. हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली जाईल.
दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. अतिक्रमण स्वत:हून काढले जात असताना जमावाने दगडफेक केली. दगडफेक करणाऱ्यांना पकडले जाईल. पोलिसांनीही अवघ्या अर्धा तासात जमावावर नियंत्रण मिळवून परिस्थिती नियंत्रणात आणली.
संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक.