

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येथील नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत महिलांच्या लैंगिक शोषणासोबतच संघटित पद्धतीने टार्गेटिंग आणि कथित धर्मांतराचे जाळे कार्यरत असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष तपास पथक चौकशीत काही धक्कादायक बाबी पुढे आल्या असून, या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.
तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, कंपनीतील काही कर्मचाऱ्यांनी व्हॉट्सअॅपवर गुप्त ग्रुप तयार करून, संभाव्य टार्गेट ठरवले जात होते. त्यानंतर निवडलेल्या तरुणींशी मैत्री वाढवून, फ्लर्टिंगच्या माध्यमातून त्यांचा विश्वास जिंकला जात होता. पुढे स्वतंत्र ग्रुप तयार करून त्यांचे ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पीडितांनी केला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, काही प्रकरणांमध्ये तरुणींना नोकरीत बदली, रजा किंवा करिअर मदतीचे आमिष दाखवून जवळीक साधली जात होती. काहींना मानसिक त्रास दिल्यामुळे त्यांनी नोकरी सोडल्याचेही समोर आले आहे.
तपासात हेही स्पष्ट झाले की, या कटात काही महिलांचाही सहभाग होता, ज्या इतर मुलींना विशिष्ट धार्मिक पद्धती व पोशाखाबद्दल पटवून देण्याचा प्रयत्न करीत होत्या. या प्रकरणी पोलिसांनी एकूण ९ गुन्हे नोंदवले आहेत.
आरोपींमध्ये आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार, शाहरूख कुरेशी आणि दानिश शेख यांना अटक करण्यात आली असून, ते सध्या कोठडीत आहेत. तर निदा खान हिचा शोध सुरू आहे. काही प्रकरणांमध्ये रिसॉर्टमध्ये नेऊन अत्याचार केल्याचेही आरोप आहेत. दरम्यान, या प्रकरणामुळे राजकीय वातावरणही तापले आहे.
भारतीय जनता पक्ष युवा मोचनि कंपनीबाहेर आंदोलन करीत कठोर कारवाईची मागणी केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांसह दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते. सध्या या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलिस कारवाई
९ गुन्हे नोंद; अनेक आरोपी कोठडीत
कंपनीच्या एचआर आश्विनी चैनानीची कोठडीत चौकशी
आधी ओळख वाढवण्यासाठी फ्लर्टिंग व गोड बोलणे
स्वतःला अविवाहित असल्याचे भासवणे जेवण, फिरणे,
नोकरीतील मदतीचे आमिष
स्वतंत्र व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये मानसिक प्रभाव टाकणे
नकार दिल्यास मानसिक छळ किंवा दबाव