Nashik Water Crisis | मालेगाव तालुक्यात ४ गावे, २२ वाड्यांना टँकरचा आधार

दररोज होतोय १ लाख ९२ हजार लिटर पाणीपुरवठा
Water Tanker
Water TankerPudhari
Published on
Updated on

मालेगाव : तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे पाणीटंचाईने गंभीर रूप धारण केले असून, प्रशासनाला तातडीने हस्तक्षेप करावा लागला आहे. एरंडगाव, मेहुणे, सावकारवाडी व वन्हाणे या चार गावांसह एकूण २२ वाड्यांना खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. या उपाययोजनेतून सुमारे ११ हजार १६० नागरिकांना दिलासा मिळत असला, तरी परिस्थितीची तीव्रता कायम आहे.

दररोज आठ फेऱ्यांमधून सुमारे १ लाख ९२ हजार लिटर पाणी पुरविले जात असून, सकाळ-सायंकाळ अशा दोन वेळा वितरण केले जात आहे. सरासरीपेक्षा समाधानकारक पाऊस होऊनही प्रखर उन्हामुळे भूजलपातळी झपाट्याने खालावली आहे. अनेक भागांत विहिरींची पाणीपातळी ८० फुटांखाली गेल्याने स्थानिक पाणीपुरवठा योजना पूर्णपणे कोलमडल्या आहेत. ग्रामपंचायतींकडून आलेल्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर महसूल व पंचायत समिती प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर प्रांताधिकारी नितीन सदगीर यांनी विशेष अधिकार वापरून टँकर सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.

दोन विहिरी अधिग्रहित

टंचाईग्रस्त भागांसाठी प्रशासनाने दोन विहिरी अधिग्रहित केल्या असून, येसगाव - चंदनपुरी परिसरातून टँकर भरले जात आहेत. चार खाजगी टँकरांच्या माध्यमातून पाणी वाहतूक सुरू असून, प्रत्येक टँकरला जीपीएस प्रणाली जोडण्यात आली आहे. त्यामुळे फेऱ्यांवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे.

६२ गावे, ३३ वाड्यांमध्ये पाणीटंचाईची शक्यता

पंचायत समितीच्या टंचाई आराखड्यानुसार एप्रिल ते जूनदरम्यान तालुक्यातील तब्बल ६२ गावे आणि ३३ वाड्यांमध्ये पाणीटंचाईची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनासमोर येत्या काळात अधिक व्यापक नियोजनाचे मोठे आव्हान उभे राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news