

nashik corporate jihad case
नाशिक : नाशिकच्या धर्मांतर, बलात्कार प्रकरणातील आरोपी निदा खानला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी गर्भवती असल्याने तिला आवश्यक औषधोपचार देण्यास तसेच दिवसातून दोन वेळा आईला भेटण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.
गुरुवारी निदा खानला संभाजीनगरमधील नारेगाव परिसरातून पोलिसांनी अटक केली होती. शुक्रवारी तिला नाशिक रोड न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. के. जी. जोशी यांच्यासमोर इन कॅमेरा सुनावणी पडली.
निदाचं मालेगाव कनेक्शन?
निदा खानला सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी विनंती सरकारी वकिलांनी न्यायाधीशांना केली. सरकारी वकील अजय मिसर यांनी सांगितले की, आरोपीचा अटकपूर्व जामीन २ मे रोजी नाकारण्यात आला होता आणि त्यानंतर ती फरार होती. नाशिक व छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला अटक केली.
पीडितेला धर्मांतराच्या उद्देशाने धमकावण्यात आल्याचा आरोप असून तिला बुरखा देणे, नमाज व हिजाबबाबत प्रशिक्षण देणे, नाव बदलून ‘हनिया’ ठेवणे अशा बाबींचा तपास सुरू असल्याचे सरकारी पक्षाने नमूद केले. पीडितेच्या मोबाईलमध्ये निदाने चिथावणीखोर रिल्स पाठवल्याचा संशय असून मालेगावशीही तिचे कनेक्शन असल्याचा संशय पोलिसांना आहे, असे सरकारी वकिलांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोपीला आश्रय देणाऱ्यात मतीन पटेल यांचे नाव पुढे आले असून याचाही तपास करायचा असल्याचे सरकारी वकिलांच्यावतीने सांगण्यात आले.
बुरखा कुठेही मिळू शकतो!
निदा खानच्या वतीने वकील राहुल कासलीवाल यांनी पोलिसांच्या आरोपांवर आक्षेप घेतला. बुरखा ही प्रतिबंधित वस्तू नसून ती कुठेही उपलब्ध होऊ शकते, असा युक्तिवाद त्यांनी केला.
मोबाईल अॅप डाउनलोड करणे किंवा लिंक पाठवणे ही सामान्य बाब असल्याचे सांगत सध्या मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपी गर्भवती असल्याने पोलिस कोठडी देताना न्यायालयाने मानवी दृष्टिकोन ठेवावा, अशी विनंती निदाच्या वकिलांनी केली.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निदा खान हिला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. आरोपी गर्भवती असल्याने वैद्यकीय उपचार, औषधे देण्यास तसेच केअरटेकर म्हणून तिच्या आईला दिवसातून दोन वेळा भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे.