

नाशिक : बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत धर्मांतर आणि महिलांच्या शोषणाचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर नाशिक आयटी असोसिएशनच्या (निटा) वतीने नुकतीच सातपूर येथे विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीत कॉर्पोरेट कल्चरच्या नावे सुरू असलेला स्वैराचार चालणार नसून, भारतीय संस्कृतीचे पालन करणे प्रत्येकासाठी बंधनकारक असेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
भारतीय संस्कृती, शिष्टाचार आणि व्यावसायिक मूल्यांवर आधारित सक्षम व सुदृढ कार्यसंस्कृती उभारणे गरजेचे आहे. जो प्रकार समोर आला, तो धक्कादायक असून, कॉर्पोरेट कल्चरच्या नावाखाली सुरू असलेला स्वैराचार गंभीर आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या विशेषतः महिला सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे आयटी क्षेत्रात भारतीय संस्कृती रुजविणे काळाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. तसेच कर्मचाऱ्यांसाठी हेल्पलाइन ई-मेलदेखील काढण्यात येणार असून, कर्मचाऱ्यांना या ई-मेलच्या माध्यमातून थेट पोलिसांकडे तक्रार करता येणार आहे. तसेच पॉश आणि विशाखा नियमांबाबतदेखील काटेकोर पालन करण्याबाबतच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत.
बैठकीत निटा अध्यक्ष अमर ठाकरे, उद्योजक प्रदीप पेशकार, अरविंद महापात्रा, माजी अध्यक्ष मकरंद सावरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या या बैठकीसाठी १२५ उद्योजक उपस्थित होते.
पॉश नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी.
विशाखा समितीचे सक्रिय, उत्तरदायी आणि प्रभावी कार्य अनिवार्य.
कार्यस्थळी सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण निर्माण करणे.
गुड टच बॅड टच सोबत वैयक्तिक मर्यादा आणि सीमारेषा आखणे.
मौखिक व शारीरिक संकेत तसेच संभाव्य धोक्याचे संकेत ओळखण्याचे प्रशिक्षण देणे.
सकारात्मक आणि संतुलित कार्यसंस्कृती निर्माण करण्यासाठी पुरुष कर्मचाऱ्यांनाही व्यावसायिक मर्यादा पाळणे, सहकाऱ्यांशी आदरपूर्वक व सन्मानाने वर्तन करणे, कार्यस्थळी शिष्टाचार राखणे.
नवीन तसेच महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि आत्मविश्वासपूर्ण वातावरण निर्माण करणे.
प्रत्येक कर्मचाऱ्याला त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार जबाबदाऱ्या देणे. अनावश्यक काम, दबाव किंवा शोषण ओळखण्यासाठी जागरूकता निर्माण करणे.
प्रत्येक आयटी कार्यालयात पोलीस प्रशासन, समाजसेवक, ज्येष्ठ पत्रकार यांचे संपर्क क्रमांक दर्शनी भागात प्रदर्शित करणे बंधनकारक.
"आयटी क्षेत्रात प्रगतीबरोबरच सुरक्षितता आणि मानवी मूल्ये तितकीच महत्त्वाची आहेत. आम्ही शोषणास कोणतीही तडजोड न करता सकारात्मक कार्यसंस्कृती निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत."
- अमर ठाकरे, अध्यक्ष, निटा
"महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना आणि जनजागृती ही काळाची गरज आहे. नाशिकचे आयटी क्षेत्र सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."
- प्रदीप पेशकार, आयटी उद्योजक