

नाशिक : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे यांचा भोंदू अशोक खरातसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये कराळे हे खरातच्या एका कार्यक्रमात उपस्थित राहून त्याच्यावर स्तुतिसुमने उधळताना दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी भोंदू अशोक खरातला आदरणीय कॅप्टन तसेच बहुआयामी व्यक्तिमत्व असा उल्लेख करीत गौरवल्याचे व्हिडिओत दिसत आहे. दरम्यान, या आरोपांबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना पत्र पाठवत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने अशा वादग्रस्त आणि कथित भोंदू व्यक्तीच्या कार्यक्रमात सहभागी होणे आणि त्याचे सार्वजनिक कौतुक करणे हे अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशा वक्तव्यांमुळे सामान्य नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो आणि लोक अशा व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू शकतात, असेही त्यांनी नमूद केले आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये कराळे यांनी केवळ स्तुतीच केली नाही, तर अशोक खरातला अध्यात्माबरोबरच राजकारण, प्रशासन, आर्मी आणि पोलीस अशा विविध क्षेत्रांचे ज्ञान असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या या विधानांमुळे वाद अधिकच वाढला आहे. दरम्यान, अशोक खरात हा महिलांच्या लैंगिक शोषणाच्या गंभीर प्रकरणात सध्या अटकेत असून, या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत.
यापूर्वीही कराळे यांच्यावर या प्रकरणात संशयास्पद भूमिका घेतल्याचे आरोप झाले होते. २०२५ मध्ये दाखल झालेल्या काही तक्रारींमध्ये तपासात फेरफार केल्याचे तसेच खरातला मदत करण्यासाठी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आता समोर आलेला व्हिडिओ त्यांच्या अडचणीत अधिक भर टाकणारा ठरत आहे.
या संदर्भात कराळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. अंजली दमानिया यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये कराळे आणि खरात यांचे फोटो व व्हिडिओ शेअर करत, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे अशा भोंदू बाबाशी काय संबंध असू शकतात? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून, कराळे यांचे कॉल रेकॉर्ड्स तपासण्याचीही गरज असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस विभागातही खळबळ उडाली असून, कराळे यांच्याविरोधात खात्यांतर्गत चौकशी होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात तृप्ती देसाई आणि शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीदेखील कराळे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांना याच प्रकरणामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे या प्रकरणाचे राजकीय आणि प्रशासकीय परिणामही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.