

मनमाड ( नाशिक ) : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मंगळवारी (दि. २) रेल्वेच्या बंधाऱ्यात मृतदेह आढळून आला. ओम धनवटे (३८) असे या तरुणाचे नाव असून, त्याला ऑनलाइन गेमिंगचा नाद होता. त्यातील तणावातून त्याने जीवनयात्रा संपवली असावी असा संशय वर्तविला जात आहे.
भारतनगर भागात राहणारा धनवटे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता. कुटुंबीयांनी शोध घेऊनही तो मिळून आला नव्हता. याबाबत मनमाड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. दरम्यान, मंगळवारी सकाळी शहरालगत असलेल्या रेल्वे बंधाऱ्यात एका तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळून आला.
पोलिसांनी ओमच्या नातलगांसह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता मृतदेह ओमचाच असल्याचे निष्पन्न होताचा त्यांच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. ओम शांत स्वभावाचा होता, मात्र त्याला ऑनलाइन गेम खेळण्याचा नाद जडला होता असे त्याच्या मित्राचे म्हणणे आहे. या खेळानेच त्याचा बळी तर घेतला नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून पोलिस सर्व शक्यता गृहीत धरून तपास करीत आहेत.