

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गणेशोत्सव म्हटले की, ढोल-ताशांचा गजर, डीजेचा दणदणाट आणि उत्साहात निघणाऱ्या मिरवणुका हे समीकरण ठरलेले. मात्र या जल्लोषाचा फटका परिसरातील नागरिकांना बसत असल्यामुळे दरवर्षी ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर येतो.
डीजे बंद करायचा की, नागरिकांनी मोठ्या आवाजाचा त्रास सहन करायचा, या दोन टोकांच्या पर्यायांऐवजी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 'तिसरा पर्याय' उपलब्ध होऊ शकतो, अशी अभिनव संकल्पना नाशिकचे नवोन्मेषक, तंत्रज्ञ व उद्योजक डॉ. सुनील खांडबहाले यांनी मांडली आहे.
डीजेचा आवाज मोठ्या ध्वनिक्षेपकातून परिसरात पसरविण्याऐवजी तो एफएम ट्रान्समीटरच्या माध्यमातून ठराविक रेडिओ वारंवारतेवर प्रसारित करायचा आणि मिरवणुकीतील सहभागींच्या कानात हेडफोन किंवा योग्य श्रवणसाधनाद्वारे थेट पोहोचवायचा, अशी ही संकल्पना आहे. त्यामुळे हजारो सहभागी एकाच संगीतावर नाचू शकतील, जल्लोष कायम राहील; परंतु रस्त्यालगतची घरे, दुकाने आणि परिसरातील नागरिकांना कानठळ्या बसविणाऱ्या आवाजापासून दिलासा मिळू शकतो.
या प्रणालीमध्ये डीजे किंवा ध्वनिमिश्रकातून आलेला संगीत संकेत एफएम ट्रान्समीटरला जोडला जाईल. ट्रान्समीटर हा संकेत रेडिओ वारंवारतेवर मर्यादित परिसरात प्रसारित करेल. सहभागींचे एफएम ग्रहणयंत्र त्याच वारंवारतेवर जुळविल्यानंतर हेडफोन किंवा अन्य श्रवणसाधनातून संगीत ऐकता येईल. म्हणजेच आवाज परिसरात पसरविण्याऐवजी संगीताची माहिती थेट श्रोत्यांपर्यंत पोहोचेल.
डीजे बंद करणे किंवा डीजेचा मोठा आवाज सहन करणे एवढेच दोन पर्याय आपल्यासमोर का असावेत? तंत्रज्ञानाच्या मदतीने तिसरा पर्याय निर्माण करता येणार नाही का? असा प्रश्न डॉ. खांडबहाले यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या मते, धार्मिक श्रद्धा आणि उत्सवाचा आनंद जितका महत्त्वाचा आहे, तितकाच नागरिकांना शांत वातावरणात राहण्याचा आणि आरोग्य जपण्याचा अधिकारही आहे.
या पद्धतीमुळे रस्त्यावर नाचणारे तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अन्य सहभागी एकाच तालावर उत्सव साजरा करू शकतील. मात्र मिरवणूक पाहण्यासाठी घराच्या गॅलरीत किंवा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांना मोठ्या आवाजाचा त्रास होणार नाही. सहभागी आपल्या श्रवणसाधनाचा आवाजही गरजेनुसार नियंत्रित करू शकतील. मात्र हेडफोनवरही अतिउच्च आवाज टाळण्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
"सार्वजनिक हिताच्या दृष्टीने प्रशासन, उत्सव मंडळे, तंत्रज्ञ आणि ध्वनी तज्ज्ञांनी या संकल्पनेची प्रायोगिक चाचणी घ्यावी. उत्सव थांबवण्याची गरज नाही, तो अधिक जबाबदार पद्धतीने साजरा करण्याची गरज आहे. श्रद्धा, आनंद आणि शेजाऱ्यांची शांतता यांचा समतोल साधणे हीच खरी नवकल्पना आहे."
- डॉ. सुनील खांडबहाले, उद्योजक