नाशिक : महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीची प्रस्तावित गुंतवणूक नाशिकला यावी, या मागणीसाठी उद्योजक आग्रही असून, त्याची दखल उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतल्यानंतर नाशिकच्या उद्योग वर्तुळात गुंतवणूकीच्या आशा बळावल्या आहेत. याच मुद्यावर शनिवारी (दि. १७) उद्योगमंत्र्यांसमवेत नाशिकच्या उद्योजकांची बैठक आयोजित केली होती. मात्र, लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमामुळे ही बैठक होवू न शकल्याने, पुढच्या बैठकीचा अद्यापही मुहूर्त ठरत नसल्याचे समोर येत आहे.
नाशिकची मदर इंडस्ट्री असलेल्या महिंद्रा ॲण्ड महिंद्राकडून देशात मोठी गुंतवणूक केली जाण्याची चर्चा असून, यासोबतच अन्य गुंतवणूक नाशिकमध्ये यावी अशी उद्योजकांची मागणी आहे. गेल्या आठवड्यात याबाबतची चर्चा पुढे आल्यानंतर त्याची दखल स्वत: उद्योगमंत्र्यांनी घेतली होती. उद्योगमंत्री सामंत यांनी गेल्या १२ ऑगस्ट रोजी नाशिकमध्येे येत, निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांच्यासह शिष्टमंडळासाेबत बैठक घेत चर्चा केली होती. तसेच नाशिकमध्ये लवकरच मोठी गुंतवणूक घोषित करणार असल्याचे सांगताना, नाशिकच्या उद्योजकांसमेवत आनंद महिंद्राची याची भेट घेवून त्यांना नाशिकमध्ये गुंतवणूक देण्याबाबतची मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. १७) मुंबई येथे नाशिकच्या उद्योजकांसमवेत उद्योगमंत्री सामंत बैठक घेणार होते. मात्र, लाडकी बहीण योजना शुभारंभाचा कार्यक्रम असल्याने ही बैठक रद्द करावी लागली. सरकारकडून पुढील काही दिवस लाडकी बहिण योजनेशी निगडीत विविध जिल्ह्यांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याने, सरकारमधील सर्वच प्रमुख मंत्री त्यात व्यस्त राहण्याची शक्यता आहे. अशात नाशिकच्या गुंतवणूकीबाबतच्या बैठकीला नेमका केव्हा मुहूर्त लागणार असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
लाडकी बहिण योजना नियोजित कार्यक्रमामुळे शनिवारची बैठक रद्द केल्यानंतर निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी पुढील बैठकीबाबतचा पाठपुरावा केला असता येत्या बुधवारी (दि.२१) मुंबईत बैठक आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, अद्यापपर्यंत तारिख आणि वेळ निश्चित नसल्याने, बैठक होईलच हे सांगणे मुश्किल आहे.