नाशिक : जिल्ह्याची मदर इंडस्ट्री असलेल्या 'महिंद्रा ॲण्ड महिंद्रा'बाबत गेल्या अडीच वर्षांत गुंतवणुकीबाबतच्या चार मोठ्या घोषणा केल्या असल्या, तरी नाशिकच्या वाट्याला भरीव अशी एकही गुंतवणूक आली नसल्याने, आता थेट आनंद महिंद्रा यांचीच भेट घेऊन नाशिकसाठी मोठ्या गुंतवणुकीची आग्रही मागणी करणार असल्याचा निर्धार निमासह अन्य औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गेल्या सोमवारी (दि.१२) नाशिकच्या उद्योजकांसमवेत आनंद महिंद्रा यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केल्यानंतर, नाशिकला मोठी गुंतवणूक येण्याबाबतच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
दळणवळण, पाणी, जमीन, हवामान अशा सर्वार्थानेच नाशिक जिल्हा उद्योगांसाठी पोषक आहे. मात्र, अशातही गुंतवणुकीत नाशिकला वेळोवेळी डावलले गेले आहे. राजकीय इच्छाशक्ती अपुरी पडत असल्याने, आता औद्योगिक संघटनांनीच मैदानात उतरण्याचे ठरविले आहे. गेल्या सोमवारी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी छत्रपती संभाजीनगर येथे राज्यात आणखी एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असल्याचे स्पष्ट केले होते. यात नाशिकला स्थान दिले जावे, यासाठी संघटनांकडून शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. तसेच महिंद्राकडून नाशिकमध्ये अडीच हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर महिंद्राने नाशिकमध्ये मोठी गुंतवणूक करावी, अशीही संघटनांची मागणी आहे. दरम्यान, उद्योगमंत्री सामंत यांनी, 'महिंद्रा'ने त्यांचा प्रस्तावित नवा प्रकल्प नाशिकमध्ये सुरू करावा, असे साकडे आपण त्यांना घालणार असून, हवी तेवढी जागाही उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितल्याने जिल्ह्यातील उद्योग वर्तुळाचे उद्योगमंत्र्यांच्या या आश्वासनाकडे लक्ष लागून आहे.
नाशिकमधील प्रकल्पाच्या विस्तारासाठी महिंद्राकडून नाशिकमध्ये अडीच हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार असल्याचे उद्योगमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले. मात्र, ही घोषणा जुनीच असून, अद्याप या गुंतवणुकीबाबतची ठोस अशी कुठलीच माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे गुंतवणुकीच्या या जुन्या घोषणेबरोबरच नवीन गुंतवणुकीबाबत आनंद महिंद्रा यांना गळ घालण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
डिसेंबर २०२३ मध्ये मंत्रिमंडळ उपसमितीत पुण्यासाठी मंजूर झालेल्या दहा हजार कोटींच्या 'महिंद्रा' प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांनी जानेवारीत दावोस परिषदेत पुन्हा घोषणा केली. त्यावरून नाशिककरांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर उद्योगमंत्र्यांनी घाईघाईत पत्रकार परिषद घेऊन पुण्याच्या प्रकल्पाचा विस्तार नाशिकमध्ये होणार असल्याचे सांगितले होते. त्यासाठी सहा हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार असल्याचे ते म्हणाले होते. मात्र, त्या गुंतवणूकीचे काय झाले? हे अद्यापपर्यंत समजू शकले नाही.
उद्योगमंत्र्यांनी नाशिकमध्ये येऊन गुंतवणुकीबाबतचे स्पष्ट केल्याने नाशिककरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. महिंद्राचा होऊ घातलेला प्रकल्प नाशिकमध्ये यावा यासाठी आनंद महिंद्रा यांची भेट घेतली जाणार आहे. महिंद्रा ॲण्ड महिंद्राला हवी ती जागा फास्ट ट्रॅकवर देण्याचे त्यांनी सूचित केले आहे. सवलती देण्याबाबतही समितीमार्फत निर्णय घेवू असे त्यांनी स्पष्ट केल्याने, नाशिककरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
धनंजय बेळे, अध्यक्ष, निमा, नाशिक.