Nashik Industry News | जांभळाने उंचावले आदिवासींचे 'अर्थ'कारण

Industry News : नाशिकसह गडचिरोली, कोकण, नगरमध्ये जांभूळ शेती जोरात
Nashik Industry News | जांभळाने उंचावले आदिवासींचे 'अर्थ'कारण
Published on
Updated on

नाशिक : सतीश डोंगरे

जंगलात मिळणारे वनउपज आदिवासींच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. जांभूळ त्यातीलच एक घटक असून, आदिवासींचे अर्थकारण उंचावण्यात फायदेशीर ठरत आहे. नाशिक जिल्ह्यासह गडचिरोलीमधील आदिवासी जांभूळ उत्पादनातून आर्थिक स्थैर्य मिळविण्यात यशस्वी ठरत असून कोकण, अहमदनगर या जिल्ह्यातील जांभूळ उत्पादक शेतकरी लाखो रुपयांचे पीक घेत आहेत. बहुगुणी फळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जांभळापासून केवळ औषधीच नव्हे, तर वाइनदेखील बनविली जात असल्याने, बाजारात जांभूळ 'भाव' खात आहे.

Summary

राज्यात सर्वाधिक जांभळाचे उत्पादन गडचिरोली या आदिवासी बहुल जिल्ह्यात घेतले जाते. अनेक फार्मा उद्योगांबरोबरच वाइन कंपन्यांना याच भागातून जांभळांचा पुरवठा केला जातो. नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथेदेखील जांभळापासून वाइन बनविली जात असल्याने नाशिक जिल्ह्यातदेखील मोठ्या प्रमाणात जांभळाचे उत्पादन घेतले जात आहे.

रानावनात पिकणाऱ्या जांभळावर आदिवासींचा अधिकार आजही कायम आहे. पूर्वी तोंडाची चव भागविण्यासह औषधीयुक्त फळ म्हणून आदिवासी बांधव जांभळाचा वापर करायचे. मात्र, मागील काही वर्षांमध्ये अनेक औषधनिर्मिती कंपन्यांकडून जांभळाची मागणी वाढल्याने, तसेच जांभळापासून वाइननिर्मितीही केली जात असल्याने आदिवासींनी उदरनिर्वाहाबरोबरच अर्थकारण उंचावण्यासाठी जांभूळ उत्पादनाला आपलेसे केले आहे. विशेषत: आदिवासी बांधवांकडून जांभळाचे उत्पादन घेतले जात असून, त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळत आहे. कृषितज्ज्ञांच्या मते, दरवर्षी दोन हजार टन जांभळाचे उत्पन्न घेतले जात असून, यामध्ये आदिवासींचा मोठा वाटा आहे.

Nashik Industry News | जांभळाने उंचावले आदिवासींचे 'अर्थ'कारण
Nashik Wine Capital | राज्यातील ३५ वाइन उद्योगांच्या खात्यांत 145 कोटी

१५ दिवसांत २० हजारांचे उत्पन्न

मृगाची चाहूल लागताच बहुगुणी जांभूळ बाजारात दाखल होत असल्याने, या काळात आदिवासी पट्ट्यातील कुटुंबची कुटुंबे जांभळाचे उत्पन्न घेण्यासाठी रानावनात फिरताना दिसतात. एका कुटुंबाकडून सीजनमध्ये सरासरी ९० ते १०० क्रेट्स इतके जांभूळ संकलित केले जातात. चालू वर्षात एका क्रेटला सरसरी १२०० ते १५०० रुपये इतके भाव मिळाला आहे. तर किरकोळ बाजारात जांभळाला चारशे रुपये किलोपेक्षा अधिक भाव मिळत आहे. अवघ्या १५ दिवसांत २० हजार रुपयांचे उत्पन्न घेतल्याचे आदिवासी बांधव सांगतात.

या जिल्ह्यांमध्ये जांभळाचे उत्पन्न

महाराष्ट्रातील गडचिरोली, महाबळेश्वर, लोणावळा, सातारा, कोल्हापूर, नागपूर, अहमदनगर, धुळे, नाशिक, पालघर जिल्ह्यांतील 'बहाडोली' आदी भागांत जांभळाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. याव्यतिरिक्त कर्नाटक, आंध्र प्रदेश, बेळगाव, बंगलोर, गुजरात या राज्यांमधील जांभळांची मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात विक्री केली जाते.

एका एकरात २५ लाखांचे उत्पन्न

अहमदनगर जिल्ह्यातील संपत किसन कोथिंबिरे या प्रगतशील शेतकऱ्याने अवघ्या एका एकरात २५ लाख रुपयांचे जांभळाचे उत्पन्न घेतले. १२ ते १५ टन जांभळांची त्यांनी विक्री केली. सुरुवातीला ६५० रुपये किलोप्रमाणे त्यांनी जांभूळ विकले. हंगामाच्या अखेरीस ३८० रुपये किलोचा त्यांना दर मिळाला. कंपन्यांना न देता ग्राहकांनाच जांभूळ विक्री करणे त्यांनी पसंत केले. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, अहमदनगर आदी जिल्ह्यांमध्ये त्यांनी जांभूळ विक्री केली. एका एकरातील उत्पन्नासाठी त्यांना ५ ते ६ लाख रुपये इतका खर्च आला.

जांभूळाचे फायदे

जांभूळाध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. जांभूळ हे मधुमेह नियंत्रणासाठी खूप महत्वाचे कार्य करते. त्याचबरोबर पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि किडनी स्टोनवर उपचार करण्यासाठी जांभूळ प्रभावी मानले जाते. त्यामध्ये लोह, कॅल्शिअम, प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात.

कोकणातील जांभूळाचा जन्म

कोकणातील पालघर जिल्ह्यात 'बहाडोली' नावाच्या गावात जांभूळाचा जन्म झाल्याचे बोलले जाते. बहाडोली येथील जांभळाची झाडे बियांपासून तयार झाली आहेत. आता जांभळाची कलमे करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. या गावातील जांभळे मोठ्या आकाराची व स्वादिष्ट असतात. मे महिना हा जांभळाचा हंगाम असल्याने महाराष्ट्रातील शेतकरी बहाडोली येथे जातात; जांभूळ फळे खरेदी करतात व त्यातून ज्या बिया निघतात, त्यांची जमिनीत पेरणी करतात. तामीळनाडू, कर्नाटक, आंध्र व गुजरात शेतकरीसुद्धा लागवडीसाठी बहाडोली येथून जांभूळ खरेदी करतात.

मागील दोन महिन्यात सहाशे ते सातशे कॅरेट जांभूळ विक्री केली असून, त्यातून एक लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे. प्रारंभी आठशे रुपये किलोप्रमाणे जांभूळ विकले. आता अडीचशे ते तीनशे रुपये दर मिळतो. आदिवासी भागात जांभूुळ विक्रीकडे अनेकांचा कल असून, हंगामात जवळपास प्रत्येक कुटुंबांकडून दीड, दोन महिन्यात एक लाख रुपयांची कमाई केली जाते.

एकनाथ बोडके, जांभूळ विक्रेता, नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news